scorecardresearch

बॉलिवूडमधले ‘बारिशकर’

दोन प्रेमी जीवांची एकमेकांसाठीची तगमग दाखवताना सिनेमात पाऊस अगदी रोमँटिक होऊन येतो. पण तो असतो मात्र कृत्रिम…

पावसाळा विशेषांक, सैजन्य –
दोन प्रेमी जीवांची एकमेकांसाठीची तगमग दाखवताना सिनेमात पाऊस अगदी रोमँटिक होऊन येतो. पण तो असतो मात्र कृत्रिम.. अगदी ठरवून, मोजून मापून, हवा तिथे, हवा तितका पाडलेला.. असा नेमका पाऊस पाडून दाखवणारी खास माणसंच आहेत बॉलिवूडमध्ये..
मुसळधार पाऊस कोसळतो आहे. नखशिखान्त भिजलेले दोन प्रेमी एकाच छत्रीतून फिरत गाणं म्हणताहेत. १९५५ मध्ये आलेल्या राज कपूर नर्गिसच्या ‘श्री ४२०’ मधलं ‘प्यार हुआ इकरार हुआ’ हे पावसातलं गाणं तर नंतर आलेल्या बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांतील गाण्याचं प्रतिनिधिक रुप होतं.
यावर्षीचा बॉलिवूड सिनेमातला लक्षात राहणारा पाऊस आहे, ‘आशिकी २’ मधला. आदित्य रॉय कपूर  आणि श्रद्धा कपूर एकाच कोटमध्ये भिजताहेत. अर्थात त्याआधी बॉलिवूडच्या छत्रीवरून बरंच पाणी वाहून गेलंय. आता ‘चलती का नाम गाडी’मधलं (१९५८) एक लडकी भीगी भागी सी हे नटखट गाणं असो की, ‘मंझिल’(१९७९)मधलं रिमझिम गिरे सावन हे सुरेख गाणं असो, ‘युवा’ (२००४) मधलं अवखळ कभी नीम नीम असो.. फिल्मी रोमान्समध्ये या गाण्यांनी भरच घातली आहे.
एक काळ असा होता की प्रेमाची अभिव्यक्ती दाखवण्यासाठी दिग्दर्शकाला दोन फुलं, चोचीत चोच घातलेले दोन पक्षी वगैरे दाखवावे लागायचे. मग हुषार दिग्दर्शकांना सूचक प्रेमाची अभिव्यक्ती दाखवण्यासाठी पाऊस हा अधिक बोल्ड मार्ग सापडला. काहीजणांना त्यातून चक्क रोजगार मिळाला. हे काहीजण म्हणजे सिनेमात हवा तेव्हा, हवा तेवढा पाऊस पाडणारे बॉलिवूडमधले बारिशकर.. अर्थात सिनेमात हवा तेव्हा पाऊस पाडणं हाच ज्यांचा व्यवसाय आहे, असे लोक.
सुरूवातीच्या काळात फिल्म सेट डिझाईन करणारे कला दिग्दर्शकच पाऊस पाडायची जबाबदारी घ्यायचे.  ते टँकर मागवायचे, पाईप, स्प्रिंकलरच्या सहाय्याने पाऊस पाडायचे. नव्वदच्या दशकात पावसाच्या दृष्यांचं प्रमाण वाढलं आणि बॉलिवूडमध्ये पाऊस पाडणं हे एक महत्त्वाचं कामच होऊन बसलं. एवढं की बऱ्याच कला दिग्दर्शकांनी त्यासाठी वेगळी माणसं नेमायला सुरूवात केली. त्यासाठी वेगळे पैसे घ्यायला सुरूवात केली. तेव्हापासून कृत्रिम पाऊस पाडणाऱ्यांना लोकांना, म्हणजेच बारिशकरांना बॉलिवूडमध्ये महत्त्व आलं आहे. दिनेश यादव आणि त्याच्या भावाने मिळून तर निव्वळ सिनेमात पाऊस पाडण्यासाठीची सर्व साधनं पुरवणारी तिरंगा एंटरप्रायजेस नावाची कंपनीच काढली आहे.
दिनेशच्या कंपनीने गोविंदाची भूमिका असलेल्या ‘खुद्दार’ (१९९४) या सिनेमात सगळ्यात पहिल्यांदा पाऊस पाडला होता. त्यानंतरच्या काळात त्यांनी ‘मोहरा’ (१९९४), ‘दिल तो पागल है’ (१९९७), ‘हम दिल दे चुके सनम’ (१९९९), ताल (१९९९), देवदास’ (२००२), ‘चमेली’ (२००३), ‘ओंकारा’ (२००६) अशा अनेक चित्रपटांमध्ये पाऊस पाडला आहे. सध्या ते अब्बास तरेवालाच्या आगामी सिनेमासाठी पाऊस पाडत आहेत.
अर्थात दिनेश यादवशिवायही बॉलिवूडमध्ये हसमुख सोळंकी आणि शिवासारखे आणखी काही बारिशकर आहेत. ते तर बॉलिवूड सिनेमांशिवाय जाहिराती, टीव्ही कार्यक्रमांसाठीही पाऊस पाडतात. सिनेमा, जाहिराती, टीव्ही यांच्याकडे पावसाच्या दृश्यांचं एवढं काम असतं की बॉलिवूडमध्ये पाऊस पाडणं हे एक करियरच बनलं आहे, सोळंकी सांगतात. त्यांनी नुकतंच ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा’ या सिनेमासाठी पावसाचं दृश्य चित्रित केलं. ‘क्या हुआ तेरा वादा’, ‘बडे अच्छे लगते है’, ‘परिचय’ अशा बालाजी टेलिफिल्म्सच्या टीव्ही कार्यक्रमांसाठीही त्यांनी अलीकडच्या काळात पाऊस पाडला.
सिनेमात त्यांच्यामुळे पाऊस अत्यंत देखणा होऊन येत असला तरी सिनेमाशी संबंधित अनेक तांत्रिक कामांसारखंच आणि त्या कामांइतकंच हे एक अतिशय तांत्रिक काम आहे. त्याला कसलंही ग्लॅमर नाही. दिनेश यादव सांगतात, आम्ही सेटवर जातो, आमचं काम करतो, परत येतो. ‘देवदास’सारख्या एखाद्या सिनेमात पावसाच्या दृष्यांसाठीचा सेट बरेच दिवस लावावा लागला होता तर बाकी सिनेमात ते एक ते दोन दिवसांचं काम होतं. पावसाचं दृश्यं किती मोठं असेल हे सिनेमाच्या बजेटवरही अवलंबून असतं. बजेट जास्त असेल तर ते जास्त टँकर मागवू शकतात, लाइटचे जास्त इफेक्ट देऊ शकतात..
सहा नोझल असलेला एक टँकर असेल तर त्यासाठी हे बारिशकर एका सीनसाठी एक हजार रुपये आकारतात. नोझलची संख्या वाढते तसंतसं किंमत वाढत जाते. या रीतीने एका सीनसाठी वीस हजार रुपये मिळू शकतात.  अर्थात हा दर ठरलेला असतो. अमूक माणूस अनुभवी किंवा जास्त प्रसिद्ध म्हणून त्याचा दर वाढला असं होत नाही. शूटिंग करताना टेक वर टेक होतात तेव्हा वापराव्या लागणाऱ्या टँकरची संख्याही वाढते. आमच्याकडून आम्ही मात्र ठरलेल्या वेळेतच काम पूर्ण करायचा प्रयत्न करतो. यादव सांगतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बॉलिवूडच्या तंत्रामध्ये आजवर इतके बदल झाले, पण पाऊस पाडण्याच्या तंत्रात मात्र काहीही बदल झालेला नाही.
शिवा सांगतो, आमचं काम म्हणजे असं आहे की कधी कधी आम्ही महिन्याचे तीसही दिवस कामात असतो तर कधी काहीच काम नसतं. टँकर, नोझल, स्प्रिंकलर्स हे त्यांचं कामाचं साहित्य. ते एरवी कुठेतरी ठेवून दिलेलं असतं. काम असतं तेव्हाच ते बाहेर काढलं जातं आणि सेटवर पाठवलं जातं. काम असतं तेव्हा ते ज्युनियर आर्टिस्ट असोसिएशनकडून तात्पुरती माणसं घेतात. पाऊस पाडणं या कामाला कदाचित ग्लॅमर नसेल, ते कदाचित फारसं कलात्मक नसेल पण ते कमी महत्त्वाचं आहे असं मात्र अजिबात नाही. आम्ही रोमँटिक गाण्यात त्या जोडप्याच्या अंगावर पाऊस पाडतो तेव्हा प्रेक्षक त्या पावसाची दखल घेत असतात, सोळंकी सांगतात. ते ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’च्या रिमझिम रिमझिम आणि ‘मोहरा’च्या टीप टीप बरसा पानी या गाण्यांचं उदाहरण देतात. त्यांच्या मते ही गाणी त्यातलं संगीत किंवा बोल किंवा दृश्यं यापेक्षाही त्यातल्या पावसासाठी आजही लोकांच्या लक्षात राहिली आहेत. बीजन दास गुप्ता हे कला दिग्दर्शक सांगतात, एक काळ असा होता की तेव्हाच्या पुराणमतवादी प्रेक्षकांना फक्त चेहऱ्यावरचे हावभाव दाखवलेले पुरायचे नाहीत. त्यांना आणखी काही तरी हवं असायचं. त्यासाठी दिग्दर्शकाला नायिकेला पावसात नाचावं, गावं लागायचं. दासगुप्ता यांनी ‘मिस्टर इंडिया’मधलं ‘काटे नही कटते’ हे पावसातलं गाणं डिझाइन केलं होतं. ते गाणं आजही अनेकाना आठवतं आणि आवडतं. नर्गिस, मंदाकिनी, झीनत अमान, डिंपल यांना पावसात नाचायला लावून राज कपूर यांनी हा ट्रेंडच आणला.
सिनेमात सुरू झालेला पावसाळा आता टीव्हीतही रुजला आहे. पावसाळ्यात टीव्हीवरच्या प्रत्येक शोमध्ये आठवडय़ाला दोनदा तरी पाऊस दाखवला जातो. त्यामुळे खरं तर आम्हाला सिनेमापेक्षा टीव्ही शोमधूनच जास्त काम आणि पैसा मिळतो. सोळंकी सांगतात. ‘इस प्यार को क्या नाम दूँ’, ‘मधुबाला इक इश्क की जुनून’, ‘मिले जब हम तुम’ यासारख्या टीव्हीवरच्या मालिकांचे लेखक गौतम हेगडे सांगतात, कोणत्याही कथानकात पाऊस आवश्यक असतोच असं काही नाही, पण तो एक वेगळंच वातावरण मात्र निर्माण करतो. त्यांच्या मते टीव्ही-सिनेमातून येणारा पाऊस हा शारीरिक आकर्षणाशी निगडित आहे. त्या त्या क्षणी तो ते वाढवतो.
सिनेमातला पाऊस रोमान्सशी निगडित असला तरी एरवीही अनेक दृष्यांमध्ये पाऊस अपरिहार्यपणे दाखवला जातो, असं यादव यांचं म्हणणं आहे. ते सांगतात अनेक सिनेमांमध्ये पाठलाग, हाणामारीची दृष्यं पावासाच्या पाश्र्वभूमीवर चित्रित करण्यात आली आहेत. बदलत्या नात्याचं, बदलत्या काळाचं चित्रण करण्यासाठीही पाऊस दाखवला गेला आहे. ‘गाईड’मध्ये देव आनंद आणि वहिदा रेहमान यांच्या बदलत्या नात्याचे पैलू दाखवण्यासाठी, विश्वास तसंच स्पिरिच्युअल मूड दाखवण्यासाठी पाऊस दाखवला आहे. ‘लगान’मध्ये कथानक पुढे नेण्यासाठी पावसाचा उपयोग होतो. हेगडे यांच्या मते टीव्ही शोमध्ये तसंच संघर्षांच्या दृश्यांमध्ये पाऊस दाखवणं अधिक प्रभावी ठरतं. ‘मधुबाला एक इश्क, एक जुनून’ या टीव्ही मालिकेत सुलतान आणि आरके या दोन प्रमुख व्यक्तिरेखा पावसात एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या होत्या. पावसाचं वातावरण आणि लायटिंगच्या इफेक्टमुळे ते दृष्य अधिक प्रभावी झालं.
हे सगळं वाचून कुणाच्याही मनात येणारा साधा प्रश्न असा असतो की हे सगळं ठीक आहे, पण मग पावसाचं दृश्य खऱ्या पावसातच का चित्रित केलं जात नाही? कारण असं की अगदी पावसाळ्यातही तुम्हाला हवा तेव्हा हवा तेवढा पाऊस पडेल याची खात्री देता येत नाही. पावसाचं दृश्य चित्रित करताना लाइट इफेक्ट द्यायचा असतो. इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं हाताळायची असतात. प्रत्यक्ष पावसात चित्रण करताना सेटवर अनेक अपघात होण्याची शक्यता असते. कुमार सांगतात, कृत्रिमरीत्या पाडलेल्या पावसावर आमचं नियंत्रण असतं. त्यासाठी आम्ही तयारी करू शकतो. समजा आम्ही दहा नोझल लावून पाऊस पाडला की तो बघून दिग्दर्शकाला कुठे किती लाइट ठेवायचा याचा अंदाज येतो. लाइट कमी जास्त करता येतो. दृश्याच्या गरजेनुसार पावसाचं प्रमाण कमी जास्त ठेवता येतं. प्रत्यक्षातल्या खऱ्या पावसात हे काहीच करता येत नाही, असं यादव सांगतात.
(‘एक्स्प्रेस आय’मधून साभार)

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-08-2013 at 06:20 IST

संबंधित बातम्या