Santosh Juvekar Talks About Trolling During Chhaava : अभिनेता संतोष जुवेकर मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहे. काही दिवसांपूर्वी तो ‘छावा’ चित्रपटामुळे अनेकांच्या चर्चेचा विषय झाला होता. चित्रपटातील त्याच्या कामाचं अनेकांकडून कौतुक झालेलं. परंतु, त्याच वेळी त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोलही करण्यात आलेलं. अशातच आता त्यानं याबद्दल एका मुलाखतीत सांगितलं आहे.
संतोष जुवेकरनं नुकतीच ‘एबीपी माझा’ला मुलाखत दिली आहे. त्याच्याबरोबर बॉलीवूड अभिनेते संजय मिश्रादेखील उपस्थित होते. त्यामध्ये त्याला ट्रोलिंगबद्दल विचारण्यात आलेलं. संतोषला “प्रत्येकाच्या फोनमध्ये तुझे रील असायचे, त्यावेळी तुझ्या मुलाखतीमधील व्हिडीओ व्हायरल होत होते. त्याबद्दल काय सांगशील”, असं विचाण्यात आलेलं.
संतोष जुवेकरची ट्रोलिंगबद्दल प्रतिक्रिया
अभिनेता याबद्दल म्हणाला, “२२ वर्षं झाली या क्षेत्रात काम करतोय; पण इतकी वर्षं केलेल्या कामातून जी प्रसिद्धी मिळाली नाही. ती प्रसिद्धी यामुळे मिळाली,” संजय मिश्रा यांना संतोष याबद्दल पुढे सांगत म्हणाला, “छावा चित्रपट आला तेव्हा मला खूप ट्रोल केलेलं. त्यावेळी मी एका चॅनेलसाठी मुलाखत दिलेली आणि त्यामधील काही भाग काढून, माझ्या भावना खूप चुकीच्या पद्धतीने पोहोचवल्या गेल्या.”
ट्रोलिंगबद्दल अभिनेता पुढे म्हणाला, “ज्यांनी ती मुलाखत पूर्ण पाहिली, त्यांनी मला मेसेज करून सांगितलं की, आम्हाला काहीच चुकीचं वाटलं नाही. तू योग्य बोलला आहेस. पण, ज्यांना थोडंसंच बघून, ट्रोल करण्याची खूप घाई असते, त्यांनी त्या मुलाखतीतील अर्धवट भाग पाहून, ‘अरे, बघ हा काय बोलला,’ असं केलं; परंतु त्यांनी मागचं-पुढचं काहीच पाहिलं नव्हतं.”
‘छावा’ चित्रपटाच्या वेळी संतोषने अनेक मुलाखती दिल्या होत्या.त्यातील एका मुलाखतीत त्याने ‘छावा’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत झळलेले अभिनेते अक्षय खन्ना यांच्याबद्दल प्रतिक्रिया दिलेली. यासह त्याने यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत झळकलेला अभिनेता विकी कौशलबरोबर काम करण्याचा अनुभवही सांगितलेला.
संतोषला या सगळ्यांमुळे खूप मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. त्याच्या मुलाखतीतील क्लिप्स सोशल मीडियावर खूप व्हायरल झालेल्या. त्यानंतर त्यानं मध्यंतरी याबद्दल प्रतिक्रियाही दिलेली. अशातच आता त्यानं पुन्हा एकदा याबद्दल प्रतिक्रिया देत ट्रोल करणाऱ्यांना स्पष्ट उत्तर दिलं आहे.