सध्या मराठीत एकामागून एक ऐतिहासिक चित्रपटांची घोषणा होत आहे. तर अनेक चित्रपट प्रदर्शितही झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांचा ऐतिहासिक चित्रपटांकडे पाहण्याचा ओढा देखील वाढला आहे. त्यातच आता अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे नवा ऐतिहासिक चित्रपट घेऊन येत आहेत. ‘शिवप्रताप-गरुडझेप’ असं या चित्रपटाचं नाव आहे. ‘आग्र्याहून सुटका’ हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीतला अत्यंत महत्त्वाचा आणि थरारक प्रसंग यात दाखवला जाणार आहे. या चित्रपटात मोगल बादशाह औरंगजेब याची भूमिका कोण साकारणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. नुकतंच याचे उत्तर समोर आलं आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांच्या ‘शिवप्रताप- गरुडझेप’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या अनेक नाटयमय घडामोडींपैकी ‘आग्र्याहून सुटका’हा महत्त्वपूर्ण कालखंड पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रापासून दूर उत्तरेत आणि तेही औरंगजेबाच्या अमलाखालील प्रदेशात जाऊन सहीसलामत परत येणं ही अशक्यप्राय वाटणारी कामगिरी महाराजांनी कशी फत्ते केली हे या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. आग्रा मोहिमेचा हा रोमांचकारी इतिहास ५ ऑक्टोबरला रुपेरी पडदयावर झळकण्यास सज्ज झाला आहे. त्यातच आता या चित्रपटात गुलदस्त्यात असलेल्या कलाकारांच्या नावाचा उलगडा होण्यात सुरुवात झाली आहे.

आणखी वाचा : अमोल कोल्हेंचा बहुचर्चित ‘शिवप्रताप गरुडझेप’च्या प्रदर्शनाची तारीख ठरली, नवा टीझर चर्चेत

मोगल बादशाहांमध्ये औरंगजेब असा एकमेव शासक होऊन गेला आहे, ज्याने आपल्या चातुर्यपूर्ण रणनीतीने मोगल साम्राज्याचा विस्तार केला होता. इतिहासातला सर्वात क्रूर कपटी, जुलमी, धर्मांध बादशाहा अशी त्याची ओळख सांगितली जाते. ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटात औरंगजेबाची भूमिका कोण साकारणार? याची उत्सुकता चित्रपटाच्या घोषणेपासून शिगेला पोहोचली होती. त्याचं उत्तर आता मिळालं असून ज्येष्ठ अभिनेते यतीन कार्येकर ही भूमिका साकारणार आहेत.

या भूमिकेबद्दल बोलताना यतीन कार्येकर म्हणाले, “मराठी चित्रपटसृष्टीत उत्तम खलनायकी भूमिका साकारणारे अनेक कलाकार होऊन गेले. या खलनायकांवरही रसिकांनी प्रेम केलंय. याआधीही मालिकेमध्ये मी औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. पण आता मोठया पडदयावर ती साकारण्याचा वेगळाच आनंद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेसमोर तितक्याच तोलामोलाचा औरंगजेब साकारणं महत्त्वाचं होतं. औरंगजेबाच्या स्वभावातला बेरकीपणा, कावेबाजपणा माझ्या भूमिकेच्या माध्यमातून प्रभावीपणे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, त्याला प्रेक्षकांची पसंती मिळेल अशी आशा आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान जगदंब क्रिएशन्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती स्वतः अमोल कोल्हे यांनीच केली आहे. तसेच चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे. येत्या ५ ऑक्टोबर २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.