प्रसिद्ध विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांनी बुधवारी (२१ सप्टेंबर) सकाळी दहा वाजून २० मिनिटांनी दिल्ली येथील एम्स रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ५८व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. आज दिल्लीमधील निगमबोध घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या कुटुंबियांसह कलाक्षेत्रामधील मंडळीदेखील उपस्थित होती. मात्र राजू श्रीवास्तव यांच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांचा भाऊ उपस्थित राहू शकला नाही. यामागचं कारण आता समोर आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजू श्रीवास्तव यांचं आपल्या कुटुंबियांबरोबर घट्ट नातं होतं. त्यांचं त्यांच्या भावांवरही विशेष प्रेम होतं. राजू श्रीवास्तव यांना जेव्हा रुग्णालयात भरती करण्यात आलं तेव्हा भावांनी त्यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना एकटं सोडलं नाही. पण राजू यांच्या एका भावाला मात्र अंत्यसंस्काराला येणं जमलं नाही. आजतकच्या वृत्तानुसार, त्यांचा भाऊ काजू श्रीवास्तव यांची प्रकृती सध्या ठिक नाही.

राजू श्रीवास्तव यांना जेव्हा रुग्णालयात भरती करण्यात आलं तेव्हा काजू श्रीवास्तवही त्याच रुग्णालयामध्ये उपचार घेत होते. जवळपास तीन दिवस ते एम्स रुग्णालयामध्ये भरती होते. तसेच काजू श्रीवास्तव यांची पत्नीसुद्धा गरोदर आहे. आजारपणामुळे आपल्या भावाला शेवटचं पाहताही आलं नाही याचं काजू यांना दुःख आहे. त्यांच्यासाठी हा क्षण खूपच भावनिक आणि वेदनादायी होता.

आणखी वाचा – Raju Srivastava Funeral : कुटुंबियांना अश्रू अनावर, चाहत्यांची गर्दी अन्…; राजू श्रीवास्तव यांना अखेरचा निरोप

कानपूर येथे काजू श्रीवास्तव राहतात. त्यांच्या घराबाहेरदेखील काही लोकांनी गर्दी केली होती. १० ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर राजू श्रीवास्तव यांना लगेचच रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं. गेले ४० दिवस ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांच्या प्रकृतीबाबत सतत त्यांचे कुटुंबीय माहिती देत होते. पण बुधवारी सकाळी राजू श्रीवास्तव यांनी अखेरचा श्वास घेत सगळ्यांचा निरोप घेतला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Comedian raju srivastava last rites his brother kaju will not attend funeral see details kmd
First published on: 22-09-2022 at 13:56 IST