सध्या रमजानचा महिना सुरू आहे. यानिमित्ताने काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजयने ७ मार्चला चेन्नईत इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. यासाठी अभिनेत्याने एक दिवसाचा रोजा ठेवला होता. पांढरे कपडे, डोक्यावर टोपी या पेहरावात थलपती विजय नमाज पठण करताना दिसला होता. या इफ्तार पार्टीमधील विजयचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. पण, याच चेन्नईतील इफ्तार पार्टीवरून थलपती विजयविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

माहितीनुसार, थलपती विजयने मुस्लिमांचा अपमान केल्याचा आरोप तामिळनाडूच्या सुन्नत जमातचे सय्यद कौस यांनी केला आहे. याच सुन्नत जमातने विजय विरोधात पोलीसात तक्रार दाखल केली असून चेन्नईत झालेल्या इफ्तार पार्टीत उपस्थित राहण्यावरून अभिनेत्यावर आक्षेप व्यक्त केला आहे. सय्यद कौस म्हणाले की, इफ्तार पार्टीमध्ये थलपती विजयने मुस्लीम समाजाचा अपमान केला आहे. रोजा आणि इफ्तार यांच्याशी काहीही संबंध नसणारे मद्यपी आणि गुंड लोक असं करून समाजाचा अपमान करत आहेत. अभिनेत्याची ही पद्धत एखाद्याला दुखावण्याची आहे.

दरम्यान, थलपती विजयने चेन्नईतील रोयापेट्टाच्या YMCA मैदानावर इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. त्याच्या राजकीय पक्षाकडून इथे सगळी व्यवस्था करण्यात आली होती. या इफ्तारमध्ये चेन्नईच्या १५ मशिदींच्या इमामांना निमंत्रित करण्यात आलं होतं. तसंच ३००० लोकांना थांबण्याची व्यवस्था केली होती. तेव्हा विजयने या एका दिवसाचा रोजा केला होता आणि नमाज पठण केल्यानंतर तो सोडला होता. विजय हा ख्रिश्चिन असून त्याची आई हिंदू आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्यावर्षी विजयने २ फेब्रुवारीला तळिलगा वेत्री कजगम ( तामिळनाडू विजय संघ ) द्वारे राजकारणात एन्ट्री केली. मोठ्या दिमाखात विजयची राजकारणात एन्ट्री झाली होती. थलपति विजयच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो शेवटचा अ‍ॅक्शन, थ्रिलर चित्रपट ‘द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम’ चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात प्रशांत, प्रभु देवा, मोहन, जयराम, अजमल अमीर, वैभव, योगी बाबू, प्रेमगी अमरेन, स्नेहा, लैला आणि मीनाक्षी चौधरीबरोबर पाहायला मिळला होता. आता त्याचा आगामी चित्रपट ‘जन नायकन’ प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. याचं दिग्दर्शन एच. विनोथने केलं आहे. या चित्रपटात विजयसह पूजा हेगडे, बॉबी देओल, गौतम वासुदेव मेनन, प्रकाश राज यांनी काम केलं आहे. तसंच अनिरुद्ध रविचंदर या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.