बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा सध्या जोर धरू लागल्या आहेत. येत्या वर्षाअखेरीस हे दोघं लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, दीपिका तिच्या आई आणि बहिणीसोबत लग्नाच्या खरेदीमध्ये व्यग्र आहे. तर रणवीरही कशापद्धतीने लग्न करावं याच्या नियोजनला लागला आहे.

स्पॉटबॉयने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, एकीकडे दीपिका तिच्या कुटुंबासोबत खरेदी करत आहे तर दुसरीकडे सिनेमांच्या चित्रीकरणामधून वेळात वेळ काढून ती रणवीरच्या आई आणि बहिणीसोबतही लग्नाची खरेदी करत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपिका रणवीरच्या कुटुंबाची खरेदीमध्ये मदत करत आहे. रणवीरची बहीण रितिका सध्या तिचे वजन कमी करण्याकडे लक्ष देत आहे. भावाच्या लग्नात तिला नवऱ्या मुलीप्रमाणेच सुंदर दिसायचे आहे, म्हणूनच रितिका सध्या डाएटवर आहे. तर रणवीरची आई आणि दीपिका लग्नसमारंभात कोणत्या डिझायनरचे आऊटफिट घालायचे याचा विचार करत आहेत. असे म्हटले जाते की, रणवीरच्या आईने लग्नात कोणते कपडे घालायचे इथपासून ते त्यावरचे दागिनेही दीपिकाच पसंत करत आहे.
रणवीर सध्या झोया अख्तरच्या ‘गली बॉय’ सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या सिनेमात त्याच्यासोबत आलिया भट्टही दिसणार आहे. ‘गली बॉय’मध्ये रणवीर एका रॅपरची भूमिका साकारत आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणानंतर रणवीर लगेच रोहित शेट्टीच्या ‘सिंबा’ सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे. तर दीपिका पदुकोणर विशाल भारद्वाज यांच्या सिनेमात काम करणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत पिकू स्टार इरफान खानही झळकणार आहे. सध्या इरफानवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. तो बरा झाल्यानंतर भारद्वाज आणि दीपिका या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहेत.