Deepika Padukone Exits Kalki 2898 AD : ‘कल्की २८९८ एडी’च्या सीक्वेलबद्दल एक बातमी समोर आली आहे. दीपिका पादुकोण सीक्वेलचा भाग असणार नाही. चित्रपटाच्या प्रॉडक्शन हाऊसने याची घोषणा केली आहे. हा चित्रपट २०२७ मध्ये प्रदर्शित होणार होता आणि दुसऱ्या भागाचे काही भाग आधीच चित्रित झाले आहेत.

नाग अश्विन दिग्दर्शित ‘कल्की २८९८ एडी’च्या प्रॉडक्शन हाऊस ‘विजयंती मूव्हीज’ने ‘एक्स’ अकाउंटवरील पोस्टमध्ये सांगितलं की, ‘कल्की’सारख्या प्रोजेक्टसाठी कमिटमेंटव्यतिरिक्त आणखी काही गोष्टींची गरज आहे. त्याशिवाय, काही वृत्तांत असा दावा केला आहे की, दीपिकानं चित्रपटासाठी आठ तासांच्या शिफ्टची मागणी केली होती, जी निर्माते स्वीकारण्यास तयार नव्हते. ही बातमी दीपिकाच्या चाहत्यांसाठी धक्कादायक आहे.

वैजयंती मूव्हीजच्या अधिकृत एक्स हँडलवर लिहिलेय, “आम्ही अधिकृतपणे घोषणा करीत आहोत की दीपिका पादुकोण ‘कल्की २८९८ एडी’च्या सीक्वेलचा भाग असणार नाही. खूप विचार केल्यानंतर, आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. पहिला चित्रपट बनवण्याच्या प्रदीर्घ प्रवासानंतरही, आम्ही पार्टनरशिप करू शकलो नाही आणि ‘कल्की’सारख्या चित्रपटाला कमिटमेंट आणि इतर गोष्टी आवश्यक आहेत. आम्ही तिच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.”

दीपिका या चित्रपटाचा भाग का नाही?

निर्मात्यांनी दीपिकाला चित्रपटातून का काढून टाकण्यात आले हे स्पष्टपणे सांगितलेले नाही; परंतु तिच्याबद्दल विविध अटकळी पसरवल्या जात आहेत. यापूर्वी दीपिकाने आठ तासांच्या शिफ्टची मागणी करीत ‘स्पिरिट’ चित्रपटातून माघार घेतली होती. आता अहवालांनुसार दीपिकाने या चित्रपटासाठीही अशाच मागण्या केल्या आहेत. ‘पिंकव्हिला’च्या वृत्तानुसार, अभिनेत्रीला ५ स्टार ट्रीटमेंट, तिच्या मानधनामध्ये २५% वाढ आणि २५ जणांची टीम हवी होती. अभिनेत्रीने अद्याप याबाबत कोणतेही विधान केलेले नाही.

‘कल्की २८९८ एडी’मध्ये दीपिकाने गर्भवती महिला सुमतीची भूमिका साकारली होती. तिच्या त्या भूमिकेला चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि विशेष म्हणजे दीपिका जेव्हा चित्रपटाचे चित्रीकरण करीत होती तेव्हा ती खऱ्या आयुष्यातही गर्भवती होती. ‘कल्की २८९८ एडी’मध्ये दीपिका आणि प्रभास यांच्या केमिस्ट्रीला खूप पसंती मिळाली होती.