बॉलिवूडची राणी ‘पद्मावती’ अर्थात अभिनेत्री दीपिका पादुकोणला कोणत्याही परिचयाची गरज नाही. बॉलिवूडमध्ये तिचं मोठं नाव आहे. 2006 मध्ये दीपिका पादुकोणने अभिनेता उपेंद्रसोबत कन्नड चित्रपटात काम करत ‘ऐश्वर्या’ हा पहिला चित्रपट केला. त्यानंतर 2007 मध्ये तिने बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानसोबत काम करत फराह खानच्या ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून यशस्वीपणे बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं. यशाच्या शिखरावर पोहोचलेली असतानाच दीपिका सुद्धा डिप्रेशनमध्ये गेली होती. मानसिक आजारासोबत जगण्याचा अनुभवातून गेलेली असल्यामुळे ती वेळोवेळी डिप्रेशनबाबत संवाद साधताना दिसून येत असते. नुकतंच तिने एक व्हिडीओ शेअर पुन्हा एकदा या विषयावर मनमोकळ्यापणाने संवाद साधला.

अभिनेत्री दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून डिप्रेशन या विषयावरचा एक व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडिओ अॅनिमेटर डॅनी केसले यांनी तयार केला आहे. या व्हिडीओमध्ये दीपिकाने व्हॉईस ओव्हर दिलाय. म्हणजेच तिने स्वतःच्या आवाजात हा व्हिडीओ तयार केलाय. या व्हिडिओमध्ये दीपिकाने मनातली चिंता कशी हाताळायची हे सांगितले आहे. सोबतच ज्यांना कुणाला ‘जादू की झप्पी’ ची गरज आहे त्याला हा व्हिडीओ टॅग करण्याची विनंती देखील तिने केलीय.

दीपिका पदुकोण नेहमीच मानसिक जागरूकतेवर बोलताना दिसून येत असते. एकापाठोपाठ एक हिट चित्रपट देणारी दीपिका पादुकोण बऱ्याच काळापासून डिप्रेशनची शिकार झाली होती. 2014 मध्ये नैराश्याने तिलं इतकं वश केलं की की तिच्या आयुष्यात काहीच शिल्लक नाही, असं वाटू लागलं होतं. करिअर ऐन भरात असताना दीपिकाला डिप्रेशनचा त्रास सुरू झाला होता. त्यातून दीपिका यशस्वीपणे बाहेर पडली. त्यानंतर डिप्रेशनविषयी व त्यातून जाणाऱ्या व्यक्तींच्या त्रासाची जाणीव तिला झाली. त्यानंतर दीपिका एक स्वयंसेवी संस्था सुरू केली. मानसिक समस्यांनी ग्रस्त लोकांसाठी लिव्ह लव्ह लाफ फाउंडेशन सुरू केलं. एक काळ होता जेव्हा दीपिका स्वतः नैराश्याने ग्रस्त होती आणि मोठ्या प्रयत्नांनंतर स्वतःला त्यातून बाहेर काढले, आता ती मानसिक आरोग्य समस्यांनी ग्रस्त लोकांना मदत करताना दिसून येत आहे.