बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण ‘ट्रिपल एक्सः द रिटन ऑफ झेंडर केज’ या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. ‘xXx: द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या चित्रपटातून सेरेना उनगेरची भूमिका साकारणारी दीपिका या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. २०१६ च्या वर्षाअखेर म्हजेच ३१ डिसेंबरला ‘xXx: द रिटर्न ऑफ झेंडर केज’चा हिंदी ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरला यूट्यूबवर चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत १३ लाखांपेक्षाही अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

‘ट्रिपल एक्स’ चित्रपट मालिकेतील तिसरा आणि बहुप्रतिक्षित असा हा ‘xXx: द रिटर्न ऑफ झेंडर केज’ हा चित्रपट सर्व प्रथम भारतामध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती दीपिकाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन बुधवारी दिली होती. जगातील कोणत्याही देशातील प्रदर्शनापूर्वी १४ जानेवारीला हा चित्रपट भारतीय चित्रपटगृहात दाखल होईल, असे दीपिकाने म्हटले आहे. भारतामध्ये प्रदर्शित झाल्यानंतर २० जानेवारीला हा चित्रपट इतर देशात प्रदर्शित होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, बॉलीवूडच्या दोन दीवा म्हणजेच दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा या दोघीही या वर्षात हॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहेत. प्रियांका बेवॉच चित्रपटातून हॉलीवूडमध्ये पदार्पण करत असून यात ती ड्वेन जॉन्सन म्हणजेच द रॉकसोबत झळकणार आहे. भारतात परतलेल्या प्रियांकाने दीपिकाच्या आगामी ‘xXx द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या चित्रपटाविषयी काही दिवसांपूर्वीच वक्तव्य केले. प्रियांका आणि दीपिका या एकमेकांच्या खूपच चांगल्या मैत्रिणी आहेत. काही दिवसांपूर्वी बॉलिवूडची ‘मस्तानी’ आणि ‘देसी गर्ल’ यांच्यात वादाची ठिणगी उडाल्याच्या चर्चांना उधाण आले होते. पण, प्रियांकाच्या बोलण्यावरुन तरी तसे काहीच जाणवले नाही. प्रियांकाने दीपिकाची फारच प्रशंसा करत ‘मी तिच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला. दीपिकाला मी त्यासाठी मनापासून शुभेच्छा देते आणि तिला अपेक्षित यश मिळावं यासाठी शुभेच्छाही देते’, असे म्हटले होते.