Diana Penty On Her 12-Year Relationship With BF : ‘कॉकटेल’ व ‘हॅप्पी भाग जायेगी’ यांसारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री डायना पेंटी सध्या तिच्या आगामी ‘डिटेक्टिव्ह शेरदिल’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, अभिनेत्रीने तिच्या लव्ह लाइफबद्दल सांगितले.
चित्रपटाइतकीच तिच्या खासगी आयुष्याचीही सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. डायनाने तिच्या १२ वर्षांच्या प्रेमसंबंधावर मोठा खुलासा केलाय. १२ वर्षांपासून हर्ष सागरबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचं तिनं सांगितलं आहे.
डायनाची हर्षशी २२ वर्षांपासूनची ओळख
‘हटरफ्लाय’शी झालेल्या संभाषणादरम्यान, डायना पेंटीने हर्ष सागरबरोबरच्या तिच्या नात्याबद्दल उघडपणे सांगितले. अभिनेत्रीने खुलासा केला की, ती १० वर्षांहून अधिक काळ हर्ष सागरबरोबर सीरियस रिलेशनशिपमध्ये आहे. तिने सांगितले की, मला कधीही कोणाबरोबरही कॅज्युअल रिलेशनशिपमध्ये रस नव्हता. मी जुन्या विचारांची आहे. तिचे नाते सार्वजनिक करण्याच्या प्रश्नावर ती म्हणाली की, मी छतावर जाऊन त्याबद्दल भाषण देणार नाही. हर्ष आणि मी एकमेकांना २२ वर्षांपासून ओळखतो आणि १२ वर्षांपासून एकत्र आहोत.
लग्नासाठी कोणताही दबाव नाही : डायना पेंटी
तिच्या नात्याबद्दल आणि लग्नाच्या प्रश्नावर डायना म्हणाली की, मी विवाहित नाही; पण माझ्या मनात मी आधीच विवाहित आहे. तेच खरं नातं असतं. जेव्हा तुम्ही एकमेकांचा आदर करता, समजून घेता आणि आनंदी राहता. माझ्या आणि हर्षच्या कुटुंबातील कोणीही लग्नासाठी दबाव आणत नाही. ते आम्हाला पाठिंबा देतात आणि ते लग्नापेक्षा आनंदी राहण्यावर विश्वास ठेवतात. मला लग्नाबद्दल कोणतीही अडचण नाही; परंतु आम्ही एकत्र राहतो. आमच्याकडे एक कुत्रादेखील आहे. कोणत्याही औपचारिकता किंवा कागदपत्रांशिवायही आमचं नातं लग्नासारखं आहे.
२०१२ मध्ये आलेल्या ‘कॉकटेल’ चित्रपटातून दीपिका पदुकोण आणि सैफ अली खानबरोबर करिअरची सुरुवात करणाऱ्या डायना पेंटीने तिच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता ती रवी छाब्रिया दिग्दर्शित ‘डिटेक्टिव्ह शेरदिल’ या आगामी चित्रपटात दिलजीत दोसांझबरोबर दिसणार आहे. हा चित्रपट २० जून रोजी OTT प्लॅटफॉर्म ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे. डायना सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. ती नेहमी तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करीत असते. तिचे चाहतेही तिच्या फोटोंना प्रचंड पसंती देतात.