ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. गेल्या महिन्याभरापासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. दिलीप कुमार यांना ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून ओळखले जाते. रुपेरी पडद्यावर दु:खी व्यक्तिरेखा साकारणा-या दिलीप यांच्या खासगी आयुष्यातील ‘ट्रॅजेडी’ फार कमी जणांना माहित आहेत. दिलीप कुमार जेव्हा चित्रपटसृष्टीतही आले नव्हते तेव्हाची ही गोष्ट आहे. तेव्हा त्यांना लोक युसुफ खान या नावानेच ओळखत होते.
दिलीप कुमार यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ साली पेशावर येथे झाला. त्यांचे वडील व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईत येऊ लागले होते. १९३०च्या दरम्यान लाला गुलाम सरवर यांनी आपल्या पत्नीसह सात मुलांनाही मुंबईत आणले. दिलीप कुमार आणि त्यांचे सर्व बहिण-भाऊ त्यांच्या वडिलांना घाबरायचे. एकदा एका छोट्या गोष्टीमुळे त्यांचे वडील त्यांच्यावर रागावले आणि याने दिलीप कुमार यांच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली.
दिलीप कुमार यांच्या आत्मकथेत याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यात दिलीप यांनी लिहलेय की, “मला नीट आठवत नाही. मी तारुण्यावस्थेत असेन तेव्हा आगाजी (वडील) एका किरकोळ मतभेदामुळे माझ्यावर रागवले. त्यानंतर मीही रागात घर सोडले. त्यावेळी दुस-या महायुद्धाला सुरुवात झाली होती. (दुसरे महायुद्ध सप्टेंबर १९३९मध्ये झाले होते.) युद्धामुळे आमच्या व्यवसायाला बराच फटका बसला होता. बहिणींचीही लग्न करायची होती. त्यामुळे मग मी आणि आगाजींना काहीतरी काम करायचे असे ठरवले होते. जोपर्यंत मला काम मिळत नाही तोपर्यंत मी घरी न जाण्याचा निर्णय मनाशी ठाम केला होता,” असे दिलीप कुमार म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचलो तेव्हाही मी घाबरलेला होतो. आगाजी माझ्यावर का रागावले याचे कारण मला कळत नव्हते. पुणे मुंबईपासून दूर असल्यामुळे तेथे मला कोणीही ओळखण्याची शक्यता कमी होती. त्यामुळेच मी तेथे जाण्याचा निर्णय घेतला होता. तोपर्यंत उर्दू, फारसी आणि इंग्रजी या भाषा दिलीप कुमार यांना चांगल्याच येऊ लागल्या होत्या. पुण्यात गेल्यानंतर रागात असलेल्या दिलीप यांना भूक लागली म्हणून ते एका इराणी हॉटेलमध्ये गेले. तेथे त्यांनी चहा आणि बिस्किटांची ऑर्डर दिली. यावेळी त्यांनी हॉटेलच्या मालकाशी फारसी भाषेत संवाद साधल्याने ते भलतेच खूश झाले.”
याविषयी दिलीप कुमार यांनी पुढे सांगितले की, “हॉटेलमध्ये असिस्टंट किंवा इतर कोणते काम करण्यासाठी जागा रिकामी आहे का, असे मी हॉटेलच्या मालकाला विचारले. त्यावर त्यांनी मला अँग्लो-इंडियन मालकाशी भेटण्यास सांगितले. मी त्याचीही भेट घेतली. मला इंग्रजी भाषा चांगली बोलता येत असल्यामुळे त्यांनी कॅन्टीन ठेकेदार म्हणून माझी नियुक्ती करण्याचे ठरवले. त्यावेळी दिलीप कुमार कॅन्टीन आणि सेना क्लब अशा दोन्ही ठिकाणांचे काम पाहत होते.
‘ट्रॅजेडी किंग’ ही उपाधी लागलेल्या दिलीपकुमार यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला ‘ज्वार भाटा’ (१९४४) पासून सुरुवात केली. ‘अंदाज’ (१९४९), ‘दीदार’ (१९५१), ‘आन’ (१९५२), ‘देवदास’ (१९५५), ‘मुगल-ए-आझम’ (१९६०), ‘गंगा जमना’ (१९६१), ‘मधुमती’ (१९५८), ‘राम और श्याम’ (१९६७), ‘आदमी’ (१९६८), ‘गोपी’ (१९७०), ‘बैराग’ (१९७६), ‘शक्ती’ (१९८२) यासारख्या चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या. १९९८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘किला’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट. अभिनयासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार त्यांनी आठ वेळा पटकावला. केंद्र सरकारने १९९४ साली त्यांना चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ आणि अतुलनीय कारकिर्दीबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित केले. १९९८ मध्ये पाकिस्तान सरकारने त्यांना ‘निशान-ए-पाकिस्तान’ हा पुरस्कार बहाल केला.