Sardaar Ji 3 will be release in Pakistan : दिलजीत दोसांझची मुख्य भूमिका असलेला ‘सरदारजी ३’ हा चित्रपट वादात अडकला आहे. याचं कारण पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी कलाकारांनी भारतात काम करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्याचदरम्यान या चित्रपटात हानिया आमिर दिलजीतबरोबर महत्त्वपूर्ण भूमिकेत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

‘सरदारजी ३’ हा चित्रपट भारतात प्रदर्शित न करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. दुसरीकडे ‘सरदारजी ३’बद्दल पाकिस्तानमधून मोठी बातमी समोर आली आहे. ‘सरदार जी ३’ पाकिस्तानात प्रदर्शित होणार आहे. पाकिस्तानी सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला त्यांच्या देशात प्रदर्शित करण्यास मंजूरी दिली आहे.

पाकिस्तानमध्ये प्रदर्शित होणार चित्रपट

पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरने चित्रपटात काम केल्याने हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार नाही. पण तो पाकिस्तानमध्ये रिलीज होणार आहे. कराचीतील सर्वात मोठ्या चित्रपट वितरकांपैकी एक असलेल्या नदीम मांडवीवाला यांनी शुक्रवारी चित्रपटाच्या प्रदर्शनाची पुष्टी केली.

“सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला मंजूरी दिली आहे. पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी आहे. पण हा चित्रपट पाकिस्तानात रिलीज होणार आहे, कारण या चित्रपटाचे एक निर्माते झैन वाली हे पाकिस्तानी आहेत,” असं मांडवीवाला म्हणाले. यासंदर्भात एबीपी लाइव्हने वृत्त दिलं आहे. आणखी एक वितरक सलीम शहजाद म्हणाले, “हा चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित करण्यास मंजूरी देण्यात आली, कारण हा एक आंतरराष्ट्रीय पंजाबी चित्रपट आहे आणि त्याला भारतीय चित्रपट म्हणता येणार नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सरदारजी ३’ संदर्भातील वादावरून गायक मिका सिंग, गुरू रंधावा यांनी दिलजीत दोसांझवर टीका केली. दुसरीकडे, चित्रपटाभोवती सुरू असलेल्या वादावर दिलजीत दोसांझने प्रतिक्रिया दिली आहे. दिलजीत म्हणाला की चित्रपटाचे चित्रीकरण पहलगाम हल्ल्यापूर्वी झाले होते. त्यावेळी परिस्थिती अशी नव्हती. पण भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी आहे, ते पाहता निर्मात्यांनी आता हा चित्रपट जगभरात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार नाही.