सध्या सर्वत्र ‘मेट गाला’ समारंभाची चर्चा सुरू आहे. येत्या सोमवारी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे ‘मेट गाला’ समारंभ आयोजित केला जाणार आहे, ज्यामध्ये जगभरातील प्रसिद्ध कलाकार सहभागी होतील.

अलीकडेच बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान आणि कियारा अडवाणी ‘मेट गाला’मध्ये सहभागी झाल्याच्या बातम्या येत आहेत. या समारंभासाठी किंग खानही न्यूयॉर्कला पोहोचला आहे, त्याचे विमानतळावरचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझदेखील ‘मेट गाला’मध्ये पदार्पण करणार आहे, ज्याची माहिती त्याने त्याच्या सोशल मीडियावर दिली आहे.

दिलजीत ‘मेट गाला’मध्ये पदार्पण करेल

गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ याने त्याच्या इन्स्टाग्रामवर दोन स्टोरी पोस्ट केल्या आहेत. एका स्टोरीमध्ये अभिनेत्याने ‘फर्स्ट टाइम’ असे लिहिले आहे. तो पहिल्यांदाच न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या ‘मेट गाला’ समारंभात सहभागी होणार आहे. तसेच त्याने दुसऱ्या स्टोरीमध्ये ‘मेट गाला’ लिहिलेल्या उशीचा फोटो पोस्ट केला आहे, ज्यामुळे हे स्पष्ट होते की तो या अमेरिकन इव्हेंटमध्ये पदार्पण करण्यास तयार आहे.

हे कलाकारही होत आहेत सामील

अमेरिकेत होणाऱ्या ‘मेट गाला’ या आगामी समारंभात अनेक भारतीय कलाकार सहभागी होणार आहेत. यामध्ये शाहरुख खान, कियारा अडवाणी, प्रियांका चोप्रा यांची नावे आहेत. किंग खान न्यूयॉर्कमध्ये पोहोचला आहे आणि कियारा अडवाणीदेखील अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये आहे.

मेट गाला फॅशन इव्हेंट अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये आयोजित केला जाणार आहे. हा समारंभ सोमवारी ५ मे रोजी होणार आहे, जिथे जगभरातील अनेक स्टार आपला जलवा दाखवताना दिसतील. फॅशन जगतातील सर्वांत मोठा समारंभ म्हणूनही याची ओळख आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या समारंभाचे आयोजन करण्यात येते. ‘मेट गाला’ला मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टस् कॉस्च्युम इन्स्टिट्यूट बेनिफिट म्हणतात. १९४८ साली ‘मेट गाला’ची सुरुवात करण्यात आली होती.