Jolly LLB 3 Reviews In Marathi : दोन जॉलींचा गोंगाट फारअनपेक्षितपणे प्रचंड यशस्वी ठरलेला चित्रपट म्हणजे २०१३ साली प्रदर्शित झालेला सुभाष कपूर लिखित, दिग्दर्शित ‘जॉली एलएलबी’. अर्शद वारसीची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट आर्थिकदृष्ट्याही यशस्वी ठरला. त्यामुळे न्यायालयीन लढाईची कथा, काहीसा चक्रम स्वभाव असलेला वकील जॉली आणि न्यायाधीश सुंदरलाल त्रिपाठी या तीन गोष्टी मध्यवर्ती ठेवत सुभाष कपूर यांनी अक्षय कुमारला घेऊन २०१७ मध्ये केलेला ‘जॉली एलएलबी २’ही यशस्वी ठरला. आता ८ वर्षांनी या दोन्ही यशस्वी ठरलेल्या जॉलींना एकत्र आणत सुंदरलाल त्रिपाठी ही व्यक्तिरेखा कायम ठेवून सुभाष कपूर यांनीच ‘जॉली एलएलबी ३’चा घाट घातला आहे. हे दोन जॉली एकत्र आल्यामुळे सुंदरलाल त्रिपाठींचा जसा गोंधळ उडतो, तसंच काहीसं या चित्रपटाचंही झालं आहे.

लेखक-दिग्दर्शक सुभाष कपूर यांनी तिन्ही चित्रपटांचा बाज कायम ठेवताना विषयांची निवड त्या त्या काळाच्या अनुषंगाने केली आहे. त्यामुळे नाही म्हटलं तरी न्यायालयात होणारे वाद-प्रतिवाद आणि त्याची मांडणी अधिक रंजक करायची तर त्यासाठी नाट्य निर्माण होईल, असा कथाविषय गरजेचा असतो. तिन्ही चित्रपटाचे कथालेखन आणि दिग्दर्शन एकाच व्यक्तीचे असल्याने कथा आणि मांडणी दोन्हीमध्ये असलेली एकवाक्यता आणि चांगला कथाविषय ‘जॉली एलएलबी ३’मध्ये आहे. मात्र दोन्ही जॉली एकत्र आल्यामुळे दोघांनाही समसमान न्याय देण्याच्या नादात त्यांचाच गोंगाट अधिक वाढला आहे. अर्थात, अक्षय कुमार आणि अर्शद वारसी दोघंही उत्तम विनोदी अभिनेते असल्याने त्यांच्या जुगलबंदीमुळे चित्रपट मनोरंजनात कमी पडत नाही. जॉली या नामसाधर्म्याचा फायदा लक्षात घेऊन जगदीश्वर त्यागीकडे (अर्शद वारसी) येणारे अशील जगदीश्वर मिश्रा (अक्षय कुमार) पळवत असतो. मिश्राला अद्दल घडवण्यासाठी त्यागी त्याच्याकडे राजस्थानहून आलेल्या ४० शेतकऱ्यांच्या आणि जानकी या वृध्द महिलेच्या जमिनीसंदर्भातील प्रकरण मिश्राकडे टोलवतो. मिश्राही केवळ पैसे कमवण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांकडून प्रकरण दाखल करून घेतो खरा… मात्र, त्यांच्याकडून काही पैसे मिळणार नाही म्हटल्यावर त्यांना हाकलवून लावतो. एकमेकांना मात देण्याच्या नादात खऱ्या विषयाकडे दुर्लक्ष करणाऱ्या दोन्ही जॉलींना जानकी आपल्याबाबतीत घडलेल्या अन्यायाचा खरी कहाणी ऐकवत खडे बोल सुनावते. चूक लक्षात आल्यानंतर जानकी आणि तिच्यासारख्या अन्य शेतकऱ्यांची जमीन लुबाडून त्यावर ‘बिकानेर टु बोस्टन’ नामक बिनकामाचा प्रकल्प राबवणाऱ्या खेतानविरुध्द दोन्ही जॉली एकत्र खटला लढवतात, अशी या चित्रपटाची सर्वसाधारण कथा आहे.

‘जॉली एलएलबी ३’ चित्रपटासाठी लेखक – दिग्दर्शक सुभाष कपूर यांनी निवडलेला विषय हा एकादृष्टाने समकालीन आणि तसा सार्वकालिक आहे. मोठमोठी श्रीमंती स्वप्नं दाखवत त्यासाठी शेतकऱ्यांच्या असहाय्यतेचा फायदा घ्यायचा आणि कमीतकमी किंमतीत त्यांच्याकडून जमिनी घेऊन त्यावर आपल्या स्वप्नांचे इमले उभारायचे, हा काही गडगंज व्यावसायिकांनी रुढ केलेला प्रकार जुनाच आहे. शेतकऱ्यांकडून जमिनी मिळवण्यासाठी सामदामदंड तिन्ही वापरायचे, तहसीलदार, जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासन सगळ्या व्यवस्थांना हाताशी धरून प्रकल्प प्रत्यक्षात आणले जातात. तोच प्रकार इथेही जानकी आणि राजस्थानमधील एका गावातील शेतकऱ्यांच्या बाबतीत घडला आहे. जमीन आपल्याकडून हिरावून घेतली म्हणून जानकीचा नवरा राजाराम सोलंकी आत्महत्या करतो.

मात्र, त्याच्या आत्महत्येला प्रेमभंगाच्या कारणाचा मुलामा देऊन जानकी आणि कुटुंबाच्या बदनामीचा प्रयत्न केला जातो. जानकी या अन्यायाविरोधात न्यायालयापर्यंत पोहोचते आणि सर्व सुरळीत चाललेल्या खेतानच्या कामाला अचानक खीळ बसते. कथेचा हा भाग काही नवीन नाही, पण त्यात रंजकता आणण्यासाठी लेखक – दिग्दर्शक सुभाष कपूर यांनी दोन्ही जॉलींचा स्वभाव, त्यांचे व्यक्तिमत्व आणि त्यांच्यातील लुटुपुटीची लढाई यांचा आधार घेतला आहे. शिवाय, आधीच्या दोन्ही भागांमध्ये अभिनेते सौरभ शुक्ला यांनी साकारलेली न्यायाधीश सुंदरलाल त्रिपाठी यांची भूमिका लोकांना फार आवडली होती. त्यामुळे तिसऱ्या भागात या व्यक्तिरेखेतील गंमत कायम ठेवताना ती अधिक टोकदारपणे दिग्दर्शकाने रंगवली आहे. आणखी एका गोष्टीसाठी दिग्दर्शकाचे आभार मानायला हवेत, की चित्रपटाची एकूण प्रकृती पाहता कुठल्याही प्रकारे गाणी घुसडण्याचा मोह दिग्दर्शकाने टाळला आहे. त्यामुळे कथा म्हणून त्याचा जो एकसंध प्रभाव आहे त्यात कुठेही खंड पडत नाही.

अर्थात, हा चित्रपट कथेपेक्षाही अक्षय कुमार, अर्शद वारसी आणि सौरभ शुक्ला या त्रिकूटाच्या अभिनयामुळे अधिक रंगतदार झाला आहे. या तिघांनी आपापल्या व्यक्तिरेखा पहिल्यासारख्याच उत्तम उचलून धरल्या आहेत. अभिनय आणि कथाप्रवाह त्यानुसार वेगवान मांडणी असली तरी अक्षय कुमार आणि अर्शद वारसी या दोन जॉलींच्या गुण-दोषांमध्ये असलेली तफावत चित्रपट ठळकपणे मांडत नाही. त्यामुळे या दोघांपैकी नेमकं कोणाला, कधी पुढे करायचं हे द्वंद्व चित्रपटाच्या शेवटापर्यंत कायम ठेवण्यात आलं आहे. या दोघांच्या एकत्रित येण्यातून कदाचित अधिक प्रभाव पाडता आला असता, मात्र ते साधण्यासाठी दिग्दर्शकाने बराच वेळ घेतला आहे. त्यांचं एकत्रित येणं हे खटल्याभोवती अधिक फिरतं. त्यामुळे चित्रपटाचा बराचसा भाग हा अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या जुगलबंदीने व्यापलेला भाग पाहणं मनोरंजक असल्याने या दोघांचा गोंगाट अधिक जाणवत असला तरी सुसह्य झाला आहे.

जॉली एलएलबी ३

दिग्दर्शक – सुभाष कपूर

कलाकार – अक्षय कुमार, अर्शद वारसी, सीमा विश्वास, हुमा कुरेशी, अमृता राव, गजराज राव, राम कपूर, शिल्पा शुक्ला.