Dulquer Salmaan House Raided Over Luxury Car Tax Evasion : दुल्कर सलमान हा लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता आहे. तो त्याच्या दाक्षिणात्य तसेच हिंदी चित्रपटांतील भूमिकांसाठी ओळखला जातो. परंतु, सध्या अभिनेता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. ते म्हणजे दुल्कर सलमान रहात असलेल्या परिसरात सध्या महसूल गुप्तचर संचालनालय आणि सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी देशभरात एक विशेष मोहीम सुरू केली आहे.

या मोहिमेअंतर्गत महागड्या गाड्यांसंबंधित कारवाई सुरू आहे. यावेळी दुल्करच्या गाड्यांचीही पाहणी करण्यात आली आहे. ‘हिंदूस्तान टाईम्स’च्या वृत्तानुसार, लक्झरी कारवरील करसंबंधित मोठी कारवाई करत महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) आणि सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘नुमखोर’ या कोडनेमने देशभरात एक विशेष मोहीम सुरू केली आहे. केरळ हे या मोहिमेतील महत्त्वाचे ठिकाण ठरत आहे. तिरुवनंतपूरम, एर्नाकुलम, कोट्टायम, कोझिकोड आणि मल्लपूरम या जिल्ह्यांतील ३० ठिकाणी तपासणी सुरू आहे.

ही मोहीम सुरू असलेल्या परिसरात अभिनेता पृथ्वीराज आणि दुल्कर सलमान यांचे निवासस्थान आहे, ज्यामधून या कारवाईचं महत्त्व स्पष्ट होतं. केरळमधील इतर उच्चभ्रू व्यक्तींचीसुद्धा तपासणी सुरू आहे. अधिकार्‍यांनी दुल्कर सलमान व पृथवीराज यांच्या घरी पोहोचल्यानंतरही संशयित वाहने आढळून आली नाहीत. सीमाशुल्क विभाग मोटार वाहन विभागासोबत समन्वय ठेवून राज्यातील प्रमुख कार शोरूममध्येही काटेकोर तपासणी करत आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही वाहने जप्त केली जातील आणि ज्या लोकांकडून ही वाहने जप्त केली जातील त्यांना नोटिसा पाठवल्या जातील. त्यांना संबंधित कागदपत्रे सादर करण्यास सांगितले जाईल. चौकशीत असे उघड झाले आहे की, आठ प्रकारची उच्च दर्जाची वाहने भूतानमार्गे भारतात आयात करण्यात आली असून याचा कर चुकवण्यात आलेला नाही. या योजनेअंतर्गत सर्वप्रथम ही वाहने हिमाचल प्रदेशात नोंदणीकृत केली जातात आणि नंतर भारतातील विविध भागांत पाठवली जातात. मूळ ओळख लपवण्यासाठी या वाहनांचे नोंदणी क्रमांक अनेकदा बदलले जातात.

अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, जरी काही उच्चभ्रू व्यक्तींच्या घरांवरच्या कारवायांकडे लक्ष वेधले गेले असले, तरी ही मोहीम ही नियोजित आणि प्रणालीबद्ध आहे. लक्झरी वाहनांना त्यांची उच्च बाजारमूल्य पाहता, अशा अवैध व्यवहारांची शक्यता अधिक असते, त्यामुळे कठोर तपासणी आवश्यक आहे. ‘नमखोर’ ही मोहीम अनेक टप्प्यांमध्ये राबवली जाणार असून, दस्तऐवजांची तपासणी, नोंदणी प्रक्रियेचा आढावा आणि वाहतूक मार्गांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या तपासणीत सेलिब्रिटींच्या घरांचा समावेश झाल्यामुळे याकडे अधिक लक्ष वेधले गेले असले तरी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की ही कारवाई पूर्णपणे प्रक्रियात्मक असून महसूलाचे रक्षण आणि नियमपालन निश्चित करण्यासाठी देशभरात सुरू असलेल्या प्रयत्नांचा भाग आहे.