Emraan Hashmi Reacts On Serial Kisser Tag : इमरान हाश्मीचे नाव घेताच प्रेमगीते, रोमँटिक सीन्स आणि हिट म्युझिक अल्बम आठवतात. त्याच्या चित्रपटांची खासियत म्हणजे त्याचा धमाकेदार अभिनयच नाही तर दमदार रोमँटिक सीन्सदेखील होते.
या सीन्समुळे त्याला ‘सीरियल किसर’चा टॅग मिळाला. पण, फार कमी लोकांना माहिती आहे की इमरान या टॅगवर अजिबात खूश नव्हता. ‘मर्डर’, ‘जहर’, ‘जन्नत’सारख्या चित्रपटांमुळे इमरान एका रात्रीत लोकप्रिय अभिनेता बनला.
इमरानला ‘सीरियल किसर’ हा टॅग आवडत नाही
नुकत्याच ‘रेडिफ’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये इमरान हाश्मीने सीरियल किसर टॅग आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर होणाऱ्या परिणामांबद्दल बोलला आहे. अभिनेत्याने म्हटलं, “जेव्हा लोक मला सीरियल किसर म्हणून ओळखतात ते मला अजिबात आवडत नाही. मी यावर अनेकदा आक्षेप घेतला आहे, पण आपण काहीच करू शकत नाही. मला कळले आहे की माझ्या नावाबरोबर सीरियल किसरचा टॅग जोडला गेला आहे आणि आता मला त्याविरुद्ध लढायचे नाही.”
त्याने पुढे सांगितले की, चाहते आणि प्रेक्षक त्याच्याकडून एका खास क्षणाची अपेक्षा करतात. याबद्दल त्याने ‘तुम मिले’ चित्रपटातील एक किस्सा सांगितला. तो म्हणाला की, एकदा तो थिएटरमध्ये हा चित्रपट पाहत होता आणि एका सीनमध्ये इमरान आणि सोहा अली खान एकटे असतात. सामान्यतः अशा सीनमध्ये त्याचे प्रत्येक पात्र अभिनेत्रीला किस करते, पण यावेळी तसे झाले नाही. मग त्याला त्याच्या जवळ बसलेल्या एका प्रेक्षकाचे म्हणणे ऐकू आले – ‘या सीनमध्ये इमरान हाश्मी आजारी होता का?’
किसिंग सीनमुळे इमरानच्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम झाला
पण, इम्रानच्या अशा व्यक्तिरेखेचा त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम झाला. इम्रानने खुलासा केला होता की, त्याचे कुटुंब अशा विचित्र सीनमुळे नाराज व्हायचे; विशेषतः त्याच्या पत्नी आणि वडिलांना ही समस्या होती.
तो म्हणाला, “माझी पत्नी परवीन किसिंग सीन पाहून रागवायची. मी जेव्हा जेव्हा असे सीन केले, तेव्हा माझी पत्नी आणि माझ्या वडिलांना अशा सीनचा त्रास होऊ लागला. पण, एक अभिनेता म्हणून तुमच्याकडे दुसरा पर्यायही नसतो. त्यानंतर सर्व काही चांगलं झालं आणि आता या सगळ्याची सवय होत गेली,” असं अभिनेता म्हणाला.
त्याच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो ‘ग्राउंड झिरो’ चित्रपटात दिसला होता. आज जरी इमरान पूर्वीसारखा सीनमध्ये दिसत नसला तरी चाहत्यांना त्याचे प्रत्येक काम खूप आवडते.