प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया(Ranveer Allahbadia) अनेकदा त्याच्या पॉडकास्टमुळे चर्चेत असतो. बॉलीवूडपासून ते आर्थिक, अध्यात्मिक, आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ त्याच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावताना दिसतात. रणवीर अलाहाबादियाचा चाहतावर्गही मोठा आहे. सोशल मीडिया अकाउंटवर त्याचे तीन मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. याबरोबरच त्याच्या बीअर बायसेप्स या यूट्यूब चॅनेलच्या सबस्क्रायबर्सची संख्याही खूप मोठी आहे. मात्र, आता रणवीर अलाहाबादिया इंडिया गॉट लेटेंटमधील त्याच्या शोमध्ये केलेल्या एका आक्षेपार्ह वक्तव्यामुळे मोठ्या चर्चेत आला आहे. त्यानंतर त्याच्यावर सर्व बाजूंनी टीका होत असल्याचे दिसत आहे. आता प्रसिद्ध गायक बी प्राकने रणवीरच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर त्याच्या शोमध्ये जाण्याचे कॅन्सल केल्याचे व्हिडीओ शेअर करीत स्पष्ट केले आहे. याबरोबरच, त्याच्यावर टीकादेखील केली आहे.

“लोकांना शिव्या देणे…”

प्रसिद्ध गायक बी प्राकने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने म्हटले, “मी एका पॉडकास्टमध्ये जाणार होतो, बीअर बायसेप्स असे या शोचे नाव आहे. मी या शोमध्ये जाण्याचे रद्द केले, कारण तुम्हाला माहीत आहे की त्याने समय रैनाच्या शोमध्ये कसे शब्द वापरले आहेत. मला वाटते की ही आपली भारतीय संस्कृती नाहीये, ही आपली संस्कृतीच नाही. तुम्ही तुमच्या पालकाबद्दल कोणती गोष्ट सांगत आहात? तुम्ही त्यांच्याबद्दल काय बोलत आहात? ही कॉमेडी आहे? ही स्टँड अप कॉमेडी नाहीये. लोकांना शिव्या देणे, लोकांना शिव्या शिकवणे ही कॉमेडी असू शकत नाही, मला समजतच नाहीये की ही कोणती पिढी आहे.”

पुढे बी प्राकने जसप्रीत सिंगवर टीका करत म्हटले, “एक सरदारजी येतात. सरदारजी तुम्हाला माहितेय की तुम्ही एक शीख आहात, तुम्हाला या गोष्टी शोभतात का? तुम्ही लोकांना काय शिकवण देत आहात? हे सरदारजी त्यांच्या इन्स्टाग्रामवर म्हणतात की मी शिव्या देतो, तर त्यात काय समस्या आहे? रणवीर अलाहाबादिया तू सनातनी धर्माचा प्रचार करतोस, अध्यात्माविषयी बोलतोस, इतके मोठमोठे लोक, संत तुझ्या पॉडकास्टमध्ये येतात आणि तुझे इतके घाणेरडे विचार आहेत?”

“माझी समय रैना व त्या शोमधील सर्व कॉमेडियन्सना एकच विनंती आहे की कृपया असे करू नका, आपल्या भारतीय संस्कृतीला वाचवा, लोकांना प्रेरणा द्या, असे काही करू नका ही माझी विनंती आहे. तुमचं नाव इतकं मोठ झालं आहे, तर तुम्ही हा विचार केला पाहिजे की आपल्या संस्कृतीला आपण लोकांपर्यंत कसे जास्तीत जास्त पोहोचवले पाहिजे. असा कंटेंट बनवू नका जो पुढच्या पिढीला खराब करेल.” पुढे चाहत्यांशी संवाद साधत त्याने म्हटले की, जर आपण या गोष्टीला थांबवू शकलो नाही तर तुमच्या भविष्यातील पिढीचे भविष्य फार वाईट असणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रणवीर अलाहाबादियाने त्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल एक व्हिडीओ शेअर करत माफी मागितली आहे.