Alia Bhatt Durga Puja Pandal Video Viral : आलिया भट्ट मुंबईत मुखर्जी कुटुंबाने आयोजित केलेल्या दुर्गा पूजेत सहभागी झाली होती. तिथे दिग्दर्शक अयान मुखर्जीने तिचे स्वागत केले आणि तो तिला आत घेऊन गेला. त्यानंतर तिने राणी मुखर्जीची भेट घेतली, जिथे राणीने तिचे खूप कौतुक केले. ती ऑलिव्ह ग्रीन रंगाच्या साडीत आली होती, ती खूपच सुंदर दिसत होती. मात्र, या मंडपामध्ये अशी एक घटना घडली की, त्यानंतर अभिनेत्रीचे कौतुक होत आहे.

दुर्गा पूजेच्या या मंडपामधील आलिया भट्टचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक अयान मुखर्जी त्याची मैत्रीण आलिया भट्टला तिच्या गाडीपर्यंत सोडताना दिसत आहेत. चाहते तिच्याबरोबर फोटो काढण्याचा प्रयत्न करीत असताना मोठी गर्दी जमली होती. तिचे बॉडीगार्डस् तिला संरक्षण देत पुढे घेऊन जात होते. पण, त्याच क्षणी एका लाल साडीतील महिलेने अभिनेत्रीचा हात ओढला. बॉडीगार्डस् त्या महिलेला मागे ढकलू लागले. पण, आलियाने त्यांना थांबवले आणि अगदी शांतपणे परिस्थिती हाताळली.

आलियाने त्यांच्याबरोबर फोटोही काढले. चाहते अभिनेत्रीच्या या कृतीचे कौतुक करीत आहेत. संपूर्ण परिस्थितीत आलियाने ज्या पद्धतीने संयम राखला, तो लोकांना आवडला आहे. दुर्गा पूजामधील आलिया भट्टचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती राणी मुखर्जीला मिठी मारताना दिसत आहे. तिनं राणीबरोबर पापाराझींसाठी पोज दिली. त्यांच्याबरोबर अयान मुखर्जीदेखील दिसला.

आलिया भट्टचं नेटकऱ्यांनी केलं कौतुक

आलिया भट्टचा व्हिडीओ पाहून लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले, “इतकं झाल्यावरही तिनं खूप आदर दाखवला आणि संयमानं काम घेतलं.” दुसऱ्याने लिहिले, “लोकांना आपली मर्यादा माहीत असायला हवी.” तिसऱ्याने लिहिले, “आलियानं परिस्थिती खूप चांगल्या प्रकारे हाताळली. खूप छान! याला म्हणतात संस्कार.”

आलिया भट्टच्या सौंदर्याचे सर्वत्र कौतुक झाले. जेव्हा साडी नेसून मंडपामध्ये दिसली तेव्हा सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. एका युजरने लिहिले, “बिहारी स्टाईल.” दुसऱ्याने लिहिले, “किती सुंदर दिसते.” दुसऱ्याने म्हटले, “ती थोडीशी करीना कपूरसारखी दिसू लागली आहे.”