बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपट प्रकरणी न्यायालयाने राज कुंद्रा आणि रायन थोर्पे यांना २७ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. १९ जुलैला राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली होती. राज कुंद्राच्या अटकेनंतर अनेक गोष्टींचा उलगडा होवू लागला आहे. दरम्यान, राज कुंद्राची कंपनी हॉटशॉट आणि गहना वशिष्ठ यांच्याविरूद्ध एफआयआर नोंदविण्यात आला आहे. यात चार निर्मात्यांचेही नावे आहेत. एका मॉडेलने हा एफआयआर दाखल केला आहे.

हे प्रकरण एका मॉडेलने दाखल केले आहे. तीने सांगितले की, तिला अश्लील चित्रपटात काम करण्यास भाग पाडले होते. या मॉडेलने मुंबई क्राइम ब्रँचशी संपर्क साधला होता आणि सांगितले होते की मोठ्या बजेट चित्रपटाचे आश्वासन देऊन तिला अश्लील चित्रपटात काम करण्यास तयार केले गेले होते. संपूर्ण प्रकरण ऐकून गुन्हे शाखेने मॉडेलला एफआयआर नोंदविण्यास सांगितले. ही घटना मालवणी परिसरातील असल्याने मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“अश्लील नव्हे तर न्यूड फिल्म बनवायचो”; राज कुंद्रा प्रकरणात चौकशी दरम्यान तनवीर हाशमीचा खुलासा

या प्रकरणात गहना वशिष्ठचे देखील नाव आहे. तसेच एफआयआरमध्ये हॉटशॉट कंपनीच्या निर्मात्यांचे नाव असून या कंपनीचे मालक राज कुंद्रा आहेत. राज कुंद्रा यांचे नाव या प्रकरणात नाही परंतु राज यांच्या अडचणी कमी झाल्याचे चित्र नाही. दरम्यान, मालवणी पोलीस ठाण्यात नोंदवलेले हे प्रकरण मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात येणार आहे.

गहना वशिष्ठला यापुर्वीही झाली आहे अटक

गहना वशिष्ठला वेब सीरिजच्या नावाखाली पॉर्न व्हिडीओ शूट करून वेबसाईटवर अपलोड केल्याच्या आरोपा खाली अटक करण्यात आली होती. फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांच्या एका पथकाने मढ येथील ग्रीन पार्क बंगलोवर धाड टाकली होती. याठिकाणी पॉर्नोग्राफिक शुटिंग होत असल्याच्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. तर एका मुलीची सुटका केली होती. अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश होता. या दोन्ही तरुणी अभिनयाच्या क्षेत्रात नशिब आजमवण्यासाठी आल्या होत्या. मात्र, त्या पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करणाऱ्या प्रोडक्शन हाऊसच्या जाळ्यात अडकल्या होत्या. या प्रकरणाचा तपास करताना अभिनेत्री गहना वशिष्ठचे नाव समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली.