गुगल ‘डुडल’वर आर. के. नारायण!

‘रासीपुरम कृष्णास्वामी अय्यर नारायण स्वामी’ असे नाव उच्चारले तर कोणाला पटकन या नावाचा काहीच अर्थबोध होणार नाही. पण जर ‘आर. के. नारायण’ असे म्हटले तर प्रसिद्ध लेखक म्हणून त्यांची ओळख आठवेल.

‘रासीपुरम कृष्णास्वामी अय्यर नारायण स्वामी’ असे नाव उच्चारले तर कोणाला पटकन या नावाचा काहीच अर्थबोध होणार नाही. पण जर ‘आर. के. नारायण’ असे म्हटले तर प्रसिद्ध लेखक म्हणून त्यांची ओळख आठवेल. पण त्याहीपेक्षा लक्षात येईल ती ‘मालगुडी डेज्’ही गाजलेली मालिका. कारण आर. के. नारायण आणि ‘मालगुडी डेज’ हे अतूट असे नाते आहे. ‘गुगल’ नेही याची दखल घेत गुगल डुडलवर ‘मालगुडी डेज्’ला स्थान दिले आहे.
आर. के. नारायण यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त ‘गुगल’ने या प्रसिद्ध भारतीय लेखकाची आणि त्यांच्या अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या ‘मालगुडी डेज्’ला ‘गुगल डुडल’वर स्थान दिले आहे. ‘गुगल’च्या संकेस्थळावर गेल्यानंतर अनेकांना हे डुडल पाहायला मिळाले. ‘गुगल’च्या ‘google’ या अक्षरांपैकी पहिल्या दोन अक्षरांनंतर हातामध्ये ‘मालगुडी डेज्’ हे पुस्तक घेतलेल्या माणसाचे चित्र पाहायला मिळते.  पुस्तकाच्या मुखपृष्ठावर ‘मालगुडी डेज्’ हे पुस्तकाचे नाव आणि मलपृष्ठावर लेखक ‘आर. के. नारायण’ यांचे छायाचित्र यावर देण्यात आले आहे.
१९८० च्या दशकात दूरदर्शनच्या राष्ट्रीय प्रसारणात ‘मालगुडी डेज्’ ही मालिका प्रसारित झाली होती. प्रचंड लोकप्रिय झालेल्या या मालिकेचे काही वर्षांपूर्वी ‘मालगुडी डेज् रिटर्न’ या नावाने पुनप्रसारणही करण्यात आले होते. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये तयार करण्यात आलेल्या या मालिकेचे तेव्हा ३९ भाग प्रसारित झाले होते. मालिकेतील ‘स्वामी’ हा लहान मुलगा, त्याचे मित्र आणि त्यांचे भावविश्व मालिकेतून सादर करण्यात आले होते. आर. के. नारायण यांनी लिहिलेल्या काही लघुकथांवर ही मालिका आधाति होती.
आर. के नारायण यांनी लिहिलेल्या ‘गाईड’ या कादंबरीवर आधारित याच नावाचा हिंदी चित्रपटही लोकप्रिय ठरला. नारायण यांना पद्मभूषण, पद्मविभूषण, साहित्य अकादमी आदी सन्मान मिळाले होते. ‘गुगल’ने आर.के. नारायण यांच्या साहित्यातील योगदानाची दखल घेऊन त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आणि मालगुडी डेज् ला गुगल डुडलवर स्थान देऊन आदरांजली वाहिली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Google doodle remembers r k narayanan