Govardhan Asrani Death News : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ व लोकप्रिय अभिनेते गोवर्धन असरानी यांचे ८४ व्या वर्षी निधन झाले. सोमवारी (२० ऑक्टोबर) दुपारी ४ वाजता मुंबईतील जुहू येथील आरोग्य निधी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर सोमवारी सायंकाळी सांताक्रूझमधील शास्त्रीनगर स्मशानभूमीत कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
असरानी यांच्या निधनानंतर बॉलीवूड विश्वात शोककळा पसरली आहे. अनेक बॉलीवूड कलाकारांनी त्यांच्या निधनांतर सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करीत असरानी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही असरानींना सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करीत दु:ख व्यक्त केले. मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करीत आहेत.
अशातच मराठी अभिनेत्री मानसी नाईक हिने असराणी यांच्या निधनंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेत्रीनं सोशल मीडियावर त्यांचा लूक रिक्रिएट केला असून, एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मानसी म्हणते, “असरानीजी हे महान कलाकार आपल्यात नाहीत यावर अजूनही विश्वास बसत नाहीय. ‘जीलों अपनी फिल्मी ख्वाहिशें’ या नितीन चंद्रकांत देसाईसरांच्या चित्रपटात मला त्यांच्या व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली. त्यासाठी मनापासून आभार, दादा.”
त्यानंतर मानसी म्हणाली, “एका स्त्री कलाकार म्हणून असरानी यांचं पात्र साकारणं हा माझ्या अभिनय प्रवासातील सगळ्यात कठीण; पण अंतर्मनाला भिडणारा असा अनुभव होता. असरानीजींचं विनोदी टायमिंग आणि हावभाव हे सगळं अगदी जादुई होतं. कुणीही त्यांची नक्कल करू शकत नाही. त्यांचं कला क्षेत्रातील योगदान सदैव कायम स्मरणात राहील.” मानसीनं शेअर केलेल्या या पोस्टखाली कमेंट्समध्ये अनेकांनी असरानींना श्रद्धांजली वाहिली आहे.
मानसी नाईकची अभिनेते गोवर्धन असरानींसाठी भावुक पोस्ट
दरम्यान, असरानी यांनी आपल्या कारकिर्दीत ३५० हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. त्यांची वैशिष्ट्यपूर्ण अभिनयशैली आणि त्यांच्या विनोदी भूमिकांमुळे ते प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात कायमचे घर करून गेले. ‘शोले’, ‘चुपके चुपके’, ‘अभिमान’, ‘शराबी’, ‘चोटे सरकार’, ‘घर परिवार’, ‘कोशिश’, ‘परिचय’ या आणि अशा अनेक चित्रपटांतील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.