Halad Rusali Kunku Hasal Marathi Serial : स्टार प्रवाहवर नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर आधारित मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्याचे पाहायला मिळते. आता या वाहिनीवर लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘हळद रुसली, कुंकू हसलं’ असं या मालिकेचं नाव आहे.
स्टार प्रवाहने हळद रुसली, कुंकू हसलं या मालिकेची थीम सांगणारे अनेक व्हिडीओ आणि प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या मालिकेची प्रेक्षकदेखील आतुरतेने वाट पाहत आहेत.
या मालिकेचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. या प्रोमोमध्ये हीरोची गाडी चिखलात स्लीप होते, असे दाखवण्यात आले आहे. गाडी स्लीप झाल्यानंतर दुष्यंत कृष्णाच्या अंगावर पडतो आणि दोघांमध्ये तिथेच वाद सुरू होतो.
दुष्यंत खाली पडल्यानंतर कृष्णा त्याला उठवण्यासाठी हात देते. गावचा रस्ता आणि गाडी व्यवस्थित चालवायची; बुंगाट चालवायची नाही, असं कृष्णा सांगते. तेव्हा दुष्यंतला राग येतो. त्यावर अभिनेता म्हणतो की, तुझ्यामुळे चिखलात पडलो. त्यावर कृष्णा म्हणते, ज्यांची नाळ मातीशी जुडलेली असते, त्यांना चिखलाचं वावगं नसतंय. तुमच्या शहरी लोकांना काय कळणार म्हणा? त्यानंतर दुष्यंत तिला इडियट म्हणताना दिसत आहे. तर, कृष्णा त्याला बुंगाट, असं म्हणताना दिसत आहे. दोघं एकमेकांकडे बोट दाखवून खुन्नस देताना दिसत आहेत, असं या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे.
हा प्रोमो शेअर करत असताना स्टार प्रवाहने ‘अशी होणार कृष्णा आणि दुष्यंतची पहिली भेट…’ अशी कॅप्शन दिली आहे. अभिनेत्री समृद्धी केळकर ’फुलाला सुगंध मातीचा’ या गाजलेल्या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेली आता नव्या भूमिकेतून पुन्हा एकदा ‘स्टार प्रवाह’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. समृद्धी केळकर दोन-अडीच वर्षांच्या विश्रांतीनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.
‘हळद रुसली, कुंकू हसलं’ या नव्या मालिकेद्वारे समृद्धी केळकरचा हा कमबॅक होतो आहे. एका गावरान, ठाम व आत्मविश्वासू तरुणीची भूमिका ती या मालिकेत साकारणार आहे. अभिनेता अभिषेक रहाळकर तिच्याबरोबर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्याने यापूर्वी ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेत काम केलं आहे.