सध्या सगळीकडे व्हॅलेंटाइन वीक सुरू आहे. तसं आपल्या मनातलं प्रेम दाखवायला कोणत्याही दिवसाची गरज नसतेच. पण सगळेच दिवस सारखे नसतात त्याचप्रमाणे प्रेमाचाही एखादा दिवस असावा जो ठरवून प्रेम करायला भाग पाडेल… व्हेलेंटाइन वीकचा हा दुसरा दिवस… प्रिय व्यक्तीला गुलाबाचं फूल देत प्रेमाची ‘पहिली हिंट’ दिल्यानंतर आजचा दिवस त्याला आणखी एक सरप्राईज द्यायचा असतो. हे सरप्राइज म्हणजे आपल्या आवडत्या व्यक्तिला प्रपोड करणं. अनेकदा प्रपोज कसं करायचं याबद्दलच मनात संभ्रम असतो. पण आता त्यावर फासरा विचार करु नका कारण आम्ही तुम्हाला अशा काही सेलिब्रिटींनी केलेल्या प्रपोजबद्दल सांगणार आहोत की, जे तुम्हाला प्रपोज कसे करावे याबद्दल थोडी कल्पना देतील. त्यांच्यासारखे प्रपोज केले तर तुम्हाला नकार मिळण्याची शक्यताच फार कमी आहे.
रोमान्सचा बादशहा म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान त्याची प्रेयसी गौरीला अनेक वर्षे डेट करत होता. झूमने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, एक दिवस शाहरुख गौरीला तिच्या घरी सोडायला गेला असता, त्याने त्या प्रवासादरम्यानच त्याच्या मनातील प्रेम व्यक्त करत लग्नाचा प्रस्ताव मांडला. माझ्याशी लग्न करशील का? असा प्रश्न विचारुन शाहरुख तिकडून लगेच निघून गेला. तिच्या होकाराची अथवा नकाराची वाटही त्याने पाहिली नाही.
तर दुसरीकडे ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची लव्हस्टोरी आहे. या दोघांचे लग्न आजही बॉलिवूडमधील सर्वात जास्त चर्चिला जाणारा विषय आहे. कुछ ना कहो सिनेमाच्या सेटवर या दोघांची ओळख झाली. सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांमध्ये घट्ट मैत्रीही झाली. या मैत्रीचे रुपांतर कालांतराने प्रेमात झाले. अखेर गुरू सिनेमाच्या सेटवर दोघांनी आपल्या मनातील भावना एकमेकांना सांगितल्या. अभिषेकने गुरू सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान ऐश्वर्याला लग्नाची मागणी घातली. दोघंही टोरोंटो, न्यूयॉर्कमध्ये सिनेमाच्या प्रमोशनसाठी गेले असता हॉटेल रुमच्या बाल्कनीमध्ये अभिषेक ऐश्वर्याला घेऊन गेला आणि तिथे त्याने ऐश्वर्याला लग्नाची मागणी घातली. त्याच्या या प्रपोजला ऐश्वर्या नाही बोलूच शकली नाही.
बॉलिवूडमध्ये अजून एका सेलिब्रिटीच्या लग्नाची सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे सैफ अली खान आणि करीना कपूर. त्यांच्या लग्नावरुन अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आले होते. काहींनी त्याला लव्ह जिहादचे नाव दिले तर काहींनी त्यांच्या लग्नाला कडाडून विरोध केला. या सगळ्या गदारोळात दोघांचे एकमेकांवरील प्रेम तूभरही कमी झाले नाही. सैफने करीनाला तीनवेळा लग्नासाठी विचारले होते.
एका मुलाखतीत करीना म्हणाली की, ‘आम्ही पॅरिसमधील रिट्स हॉटेलमध्ये बसलो होतो. तेव्हा सैफने मला प्रपोज केले होते. पण मी मात्र त्याला स्पष्ट नकार दिला होता. यानंतर याच ट्रिपमध्ये आम्ही दोघं एका चर्चमध्येही गेलो होतो. पॅरिसला भेटण्याआधीही सैफने एकदा प्रपोज केले होते. सैफच्या वडिलांना त्याच्या आईला पॅरिसमध्येच प्रपोज केले होते. शर्मिला तेव्हा पॅरिसमध्ये सिनेमाच्या चित्रीकरणासाठी गेल्या होत्या. या दोन प्रपोजनंतर सैफने मला पुन्हा एकदा विचारले आणि मी त्याला हो बोलले.’