बॉलीवूडमधील ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘शोले’ला या १५ ऑगस्ट रोजी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. रमेश सिप्पी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता आणि त्यात हेमा मालिनी, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, जया बच्चन आणि संजीव कुमार होते.
आता हेमा मालिनी यांनी अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, धर्मेंद्र यांच्याबरोबरच्या त्यांच्या खऱ्या आयुष्यातल्या प्रेमामुळे चित्रपटात त्यांची केमिस्ट्री इतकी चांगली दिसण्यास कशी मदत झाली.
“आम्ही सगळं शेअर करायचो” : हेमा मालिनी
एनडीटीव्हीशी बोलताना हेमा म्हणाल्या, “दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते. आम्ही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केल्यामुळे आमचे खूप छान नाते होते. आम्ही एकमेकांबरोबर खूप काही शेअर केले, कधी समस्या आल्या, कधी आनंद झाला. आमची मैत्री प्रेमात बदलली, मला वाटते की हे चित्रपटात दाखवले आहे. ते खूप नॅचरल होते. त्या पुढे म्हणाल्या, “हे स्वाभाविक आहे, नाही का? एक सुंदर मैत्री शेवटी एकमेकांवर प्रेम आणि काळजी घेण्यास कारणीभूत ठरते.” लग्नापूर्वी दोघांनीही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे आणि ‘शोले’ दरम्यान त्यांची मैत्री प्रेमात बदलली.
हेमा यांनी धर्मेंद्र यांच्याबरोबरच्या मंदिराच्या सीनबद्दल सांगितले होते की, “मंदिराचा सीन हा आमचा पहिला सीन होता, जो खूप मजेदार होता. बसंती सर्व काही स्वीकारत होती आणि भगवान शिवाला इतक्या निरागसतेने उत्तर देत होती. सर्व काही खूप वेगळे होते. शूटिंग बाहेर झाले आणि तेही उन्हात. मला आठवत नाही की आम्ही आत काहीही शूट केले आहे.”
बॉक्स ऑफिस कलेक्शन
‘शोले’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले, तर तीन कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने ३५ कोटींची कमाई केली होती; तर चित्रपटाने जगभरात ५० कोटींची कमाई केली होती. या चित्रपटात अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, अमजद खान, संजीव कुमार, हेमा मालिनी आणि असरानी यांसारख्या दिग्गज कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटाची पटकथा आणि संवाद सलीम खान आणि जावेद अख्तर यांनी लिहिली होती.
बॉलीवूडचे ही-मॅन म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची प्रेम कहाणी ही खूपच फिल्मी आहे. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची पहिली भेट १९७० मध्ये ‘तुम हसीन मैं जवान’ या चित्रपटाच्या सेटवर झाली. पहिल्याच भेटीत धर्मेंद्र त्यांच्यावर फिदा झाले. त्या वेळी धर्मेंद्र विवाहित होते, पण तरीही ते हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले. हेमा देखील धर्मेंद्र यांच्यावर प्रेम करू लागल्या. १९८० मध्ये धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी लग्न केले.