फिल्मी दुनियेतील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ची जगभरात चर्चा आहे. हा फेस्टिव्हल सुरू होऊन नुकतेच काही दिवस उलटले आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त हा महोत्सव दरवर्षी उपस्थितांच्या फॅशनने सातत्याने लक्ष वेधून घेतो. वर्षानुवर्षे भारतीय कलाकारही या महोत्सवात उपस्थिती दर्शवीत आले आहेत. हा ७८ वा कान्स चित्रपट महोत्सव २४ मे २०२५ पर्यंत चालणार आहे.
२०२५ च्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतातील अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी रेड कार्पेटवर पोहोचत आहेत. अभिनेत्री ऐश्वर्या रायही कान्समध्ये सहभागी होणार आहे. तसे, ऐश्वर्या याआधीही अनेक वेळा कान्समध्ये सहभागी झाली आहे. २००२ मध्ये ऐश्वर्या पहिल्यांदाच कान्समध्ये सहभागी झाली होती. तेव्हापासून २०२४ पर्यंत ती जवळजवळ प्रत्येक वेळी कान्समध्ये वेगळ्या लूकमध्ये दिसली आहे.
दर वेळेप्रमाणे या वेळीही ऐश्वर्या राय ‘कान्स’चा भाग आहे आणि तिची एन्ट्री अद्याप झालेली नाही. अशा परिस्थितीत ऐश्वर्या रायचे ‘कान्स’पासून आतापर्यंतचे सर्व फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जुन्या फोटोंमध्ये कधी कधी ऐश्वर्याला तिच्या कुटुंबाकडून पाठिंबा मिळताना दिसतो; तर कधी कधी ऐश्वर्याची मुलगी आराध्या तिच्या आईला पाठिंबा देताना दिसते.
बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या नेहमीच तिची मुलगी आराध्याला देशांतर्गत आणि परदेशात प्रवास करताना तिच्याबरोबर घेऊन जाते. चाहते अनेकदा विचारतात की, टीनएज आराध्या शाळा सोडून अशा कार्यक्रमांना का उपस्थित राहते? शाळेत जाणे किंवा न जाणे हा वेगळा विषय असला तरी ऐश्वर्या तिच्या मुलीशिवाय कुठेही जात नाही यात शंका नाही.
काही वर्षांपासून ऐश्वर्या फक्त तिची मुलगी आराध्याबरोबरच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये जात आहे. गेल्या वर्षी आई व मुलीचा फॅशनेबल लूक आणि त्यांच्या प्रेमाची व सुसंस्कृत शैलीची खूप प्रशंसा झाली आहे.
आराध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलला का जाते?
आराध्या आजपासून नाही, तर खूप लहानपणापासून तिच्या आईबरोबर या फॅशन-फिल्म कार्यक्रमाला जात आहे. ऐश्वर्याने यामागील कारण सांगितले. त्यामध्ये तिने म्हटले आहे की, कान्स हा तिच्या मुलीसाठी घरासारखा अनुभव देण्याचा, सर्वांबरोबर राहण्याचा आणि सामाजिकतेचा अनुभव आहे. आराध्या कान्समध्ये सर्वांना ओळखते आणि तिला मित्रांशी रिकनेक्ट व्हायला आवडते.
ऐश्वर्या नेहमीच तिच्या मुलीला पाठिंबा देत आली आहे आणि तिला एक्सप्लोर करण्याची संधीदेखील तिने दिली आहे. कान्समध्ये तिला ऐश्वर्यासारख्या लोकांना भेटायला आणि चांगले क्षण घालवायला आवडते. अर्थात, प्रत्येक आईने अशा प्रकारची पालकत्व पद्धत स्वीकारली पाहिजे. बऱ्याचदा पालक मुलांना बाहेर घेऊन जाण्यास कचरतात; परंतु त्यांना एक्सप्लोर करण्यासाठी अशा संधी दिल्या पाहिजेत.
आराध्याच्या ऐश्वर्याबरोबर जाण्यावर आई आणि मुलीने कधीही फार चर्चा केलेली नाही; पण ऐश्वर्याला तिच्या मुलीचे सिनेमावरील प्रेम समजते. अशा सामाजिक जागतिक प्रदर्शनामुळे मुलांचे बोलणे आणि सामाजिक कौशल्ये विकसित होण्यास मदत होऊ शकते.