Himani Shivpuri Reveals Govinda Once Didnt Board Flight Due to Superstition : १९९० च्या दशकातील काही लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्यांच्या यादीतील एक नाव म्हणजे गोविंदा. गोविंदा हा सर्वांचाच आवडता कलाकार आहे. त्याचं विनोदाचं अचूक टायमिंग आणि हटके डान्समुळे तो प्रेक्षकांचा आवडता बनला होता. आपल्या करिअरमध्ये त्याने अनेक हिट चित्रपट दिले. आता अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी गोविंदाबद्दल एक खुलासा केला आहे.
हिमानी शिवपुरी यांनी अनेक चित्रपटांमध्ये गोविंदाबरोबर काम केले आहे. त्यांनी खुलासा केला आहे की, गोविंदाने एकदा विमानात चढण्यास नकार दिला होता आणि तो घरी परतला होता. हे त्याच्या अंधश्रद्धेमुळे झाले होते आणि अरुणा इराणी यांना त्याला परत आणण्यासाठी अभिनेत्याच्या घरी जावे लागले होते.
रेड एफएमला दिलेल्या मुलाखतीत हिमानी शिवपुरी यांनी गोविंदा अंधश्रद्धेवर आधारित निर्णय कसा घ्यायचा याचा खुलासा केला. दोघांनी “साजन चले ससुराल,” “हिरो नंबर वन”, “जिस देश में गंगा रहता है,” “हद कर दी आपने,” “एक और एक ग्यारह,” आणि “जोडी नंबर वन” यासह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.
हिमानी शिवपुरी गोविंदाबद्दल काय म्हणाल्या?
हिमानी शिवपुरी म्हणाल्या, “त्याच्या (गोविंदा) बरोबर काम करणे खूप छान होते, पण काही प्रमाणात गोष्टी थोड्या वेगळ्या झाल्या. तो शुभ मुहूर्तावर आणि त्याच्या ज्योतिषांनी सांगितलेल्या वेळेवर विश्वास ठेवू लागला होता. आम्ही शूटिंगसाठी हैदराबादला जात होतो आणि अरुणा इराणी निर्मात्या होत्या. मी, रवीना टंडन, अरुणा आणि दिग्दर्शक कुकू कोहली सर्वजण पोहोचलो आणि आम्हाला कळले की गोविंदा गायब आहे, तो विमानात चढला नाही.”
हिमानी शिवपुरी पुढे म्हणाल्या, “कुकू घाबरले आणि विचारले, ‘ची-ची (गोविंदा) कुठे आहे?’ पण, अरुणाने त्याला शांत केले आणि म्हणाली, ‘तुम्ही जा, मी त्याला घेऊन येते.’ ती (अरुणा) गोविंदाच्या घरी गेली आणि संध्याकाळच्या फ्लाइटने त्याला शूटला घेऊन आली. मला खरोखर माहीत नाही की त्याच्याबरोबर काय झाले. कदाचित कोणीतरी त्याला सांगितले असेल की ही काम करण्याची योग्य वेळ नाही. पण, तो नेहमीच माझ्याशी आदराने वागला आणि त्याच्याबरोबर काम करायला खूप मजा आली.”
गोविंदाच्या या स्वभावाबद्दल अनेक अफवा पसरल्या आहेत. असे म्हटले जाते की तो गुरुवारी कोणाकडून पैसे घेत नाही. जर कोणी पैसे दिले तर तो ते परत करतो. एकेकाळी त्याने त्याच्या चित्रपटांच्या सेटवर ज्योतिषाला बोलवायला सुरुवात केली होती.