Actress Isabelle Tate Passed Away : 9-1-1: Nashville फेम हॉलीवूड अभिनेत्री इसाबेल टेट हिचे अवघ्या २३ व्या वर्षी निधन झाले आहे. तिच्या आकस्मिक निधनाने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. इसाबेल टेट हिने १९ ऑक्टोबर रोजी तिच्या घरी अखेरचा श्वास घेतला. तिची टॅलेंट एजन्सी, मॅकक्रॅ एजन्सीने सोशल मीडियावर या वृत्ताची पुष्टी केली आहे.

टीएमझेडने दिलेल्या वृत्तानुसार, १९ ऑक्टोबर रोजी २३ वर्षांच्या इसाबेलचे झोपेतच निधन झाले. इसाबेलच्या टॅलेंट एजन्सीने अभिनेत्रीच्या मृत्यूची बातमी शेअर केली. अभिनेत्रीचा फोटो शेअर करून त्यांनी लिहिलं, “आम्हाला हे जाहीर करताना खूप दुःख होतंय की इसाबेल टेट हिचे १९ ऑक्टोबर रोजी निधन झाले. ती २३ वर्षांची होती. आम्ही इझीला (इसाबेल) ती लहान असल्यापासून ओळखतो. ती अलीकडेच अभिनयात परतली होती.”

एजन्सीने पुढे लिहिलं “तिने ज्या पहिल्या सीरिजसाठी ऑडिशन दिली होती ती 9-1-1: Nashville होती. तिला या सीरिजमध्ये भूमिका मिळाली. तिने खूप छान काम केलं. तिची आई कतरिना टेट, तिची बहीण डॅनिएला आणि तिच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचं बळ मिळो. आम्ही नशिबावान होतो की तिला ओळखतो. तिची सर्वांना खूप आठवण येईल.”

इसाबेल टेटचा मृत्यू चारकोट-मारी-टूथ (Charcot-Marie-Tooth – CMT) या आजारामुळे झाला. हा एक दुर्मिळ प्रोग्रेसिव्ह न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. हा आजार स्नायूंवर नियंत्रण ठेवणाऱ्या नसांवर परिणाम करतो. इसाबेल १३ व्या वर्षांची असताना तिला या न्यूरोमस्क्युलर आजाराचं निदान झालं होतं. या आजाराने तिच्या पायांचे स्नायू हळूहळू कमकुवत झाले. २०२२ मध्ये, तिने इन्स्टाग्रामवर याबद्दल माहिती दिली होती. तसेच तिची प्रकृती हळूहळू बिघडत आहे आणि कदाचित तिला व्हीलचेअर वापरावी लागेल, असं तिने म्हटलं होतं.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर 9-1-1 Nashville ही इसाबेलची पहिलीच सीरिज होती. इसाबेलच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चाहते तिला श्रद्धांजली वाहत आहेत.