मध्यंतरी, हॉलिवूड दिग्दर्शक स्टीव्हन स्पिलबर्ग इथे आले होते. तेव्हा त्यांना काही प्रश्न विचारण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली होती. त्यावेळी तुमची इथली रुची ही तुम्हालाही इथे वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक सवलती मिळू लागल्या आहेत आणि तुमच्या चित्रपटांनाही इथे मोठे मार्केट आहे यात तर नाही ना.., असा थेट प्रश्न मी त्यांना विचारला होता. त्यावर ते गडबडले. त्यांच्याकडून ठोस असं उत्तर मला मिळालं नाही. पण, मला खरंच असं वाटतं की अचानक हे प्रेम कुठून आलं?
गेल्या आठवडय़ात वाढदिवसाच्या निमित्ताने सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी प्रसिध्दीमाध्यमांशी संवाद साधला. बाहत्तराव्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या बिग बींनी आत्ताचे हॉलिवूड-बॉलिवूड वाढते संबंध आणि तरूण दिग्दर्शक, कलाकारांची फळी याबद्दल आपली मतं नोंदवली. एकीकडे हॉलिवूडचे अमिताभ बच्चन या व्यक्तिवरचे प्रेम वाढत असले तरी खुद्द अमिताभ यांना मात्र हा हॉलिवूडचा आर्थिक कावा आहे, असे वाटते. हिंदी चित्रपटांना आज जे यश मिळते आहे त्यामागे चित्रपटसृष्टीतील आजची तरूण पिढी वेगळ्या पध्दतीने विचार करते आहे असे त्यांना वाटत नाही. तर तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे या पिढीतील दिग्दर्शकांचा एकमेकांशी संवाद, संपर्क वाढला आहे आणि त्या विचारांच्या देवाण-घेवाणीतून नव्या गोष्टी निर्माण होतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.
‘द ग्रेट गॅट्सबी’ हा अमिताभ बच्चन यांचा पहिला हॉलिवूडपट. मात्र, बॉलिवूडच्या या सुपरस्टारचे हॉलिवूडमध्ये अनेक चाहते आहेत, अगदी याच आठवडय़ात भारताच्या दौऱ्यावर असलेल्या ब्रिटीश दिग्दर्शक पीटर वेबर यांनी आपल्याला अमिताभ यांच्याबरोबर काम करायचे आहे, असे जाहीर सांगितले. मात्र, अमिताभ यांना हॉलिवूडचे हे हिंदी कलाकारांवरचे प्रेम सिनेमापोटी नाही असे वाटते. ‘आपण जगभरात सगळ्यात जास्त चित्रपट बनवतो. एवढे चित्रपट कुठल्याच देशात बनत नाही. इथे प्रत्येक भाषेतले चित्रपट बनतात. मराठी, तमिळ, तेलगू, बंगाली, गुजरात असा कितीतरी भाषेत चित्रपट बनतात. सामान्य माणसाला जे आवडतं, तो ज्यापासून प्रेरणा घेतो त्याच विषयांवर आपल्याकडे चित्रपट बनतात आणि ते लोकांनाही आवडतात. पूर्वी याच चित्रपटांची लोकांकडून विशेषत: पाश्चिमात्य देशांकडून हेटाळणी केली जायची. आज तेच हे चित्रपट खूप चांगले आहेत म्हणून कौतुक करतात’, असे सांगणाऱ्या अमिताभ यांनी त्यांचा याबाबतीतला स्वत:चा अनुभव कथन केला. ‘तीस-चाळीस वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा परदेशात शो करण्यासाठी जायचो तेव्हा फार विचित्र पध्दतीने आमच्याकडे पाहिले जात होते. काय तुम्ही नाच करता, गाणी गाता.. आज त्याचपध्दतीने जाऊन बघा. अरे वा! फार छान आहे काय नाचता तुम्ही. म्हणजे काय काय बदलले आहे ते बघा. जे जे म्हणून नावाजलेले आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहेत तिथे आज भारताचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. कित्येक महिने आधी या महोत्सवांचे आयोजक इथे भारतात येतात, फिरतात. कुठल्या प्रकारचे चित्रपट बनतात याची माहिती घेतात, पाहतात आणि मग महोत्सवासाठी आमंत्रित करतात. या सगळ्या गोष्टीवरून त्यांना भारतात रूची आहे हे समजतं’, असं सांगतानाच चित्र दिसतं आहे तसं नाही हेही त्यांनी स्पष्ट केलं. ‘मी असं मानतो की ही रुची वेगवेगळ्या अर्थाने असते. एक म्हणजे इथल्या सिनेमात त्यांना रूची आहे. दुसरी गोष्ट फार विचार करण्याजोगी आहे.
जेव्हापासून आपल्याकडे आर्थिक स्वातंत्र्य मिळालं आहे. तेव्हापासून जबरदस्त आर्थिक क्षमता असलेला देश म्हणून आपली प्रतिमा निर्माण झाली आहे. १२५ कोटींची लोकसंख्या म्हणजे १२५ कोटी खरेदीदार असं त्यांचं गणित आहे. त्यांच्यासाठी आपण १२५ कोटी खरेदीदारांची बाजारपेठ आहोत जिच्याकडे दुर्लक्ष करून त्यांना पुढे जाता येणार नाही. मध्यंतरी, हॉलिवूड दिग्दर्शक स्टीव्हन स्पिलबर्ग इथे आले होते. तेव्हा त्यांना काही प्रश्न विचारण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली होती. त्यावेळी तुमची इथली रुची ही तुम्हालाही इथे वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक सवलती मिळू लागल्या आहेत आणि तुमच्या चित्रपटांनाही इथे मोठे मार्केट आहे यात तर नाही ना.., असा थेट प्रश्न मी त्यांना विचारला होता. त्यावर ते गडबडले. त्यांच्याक डून ठोस असं उत्तर मला मिळालं नाही. पण, मला खरंच असं वाटतं की अचानक हे प्रेम कुठून आलं? आपले चित्रपट असतील, आपली संस्कृती असेल, आपला पेहराव असेल नाहीतर आपली खाद्यसंस्कृती या सगळ्याच गोष्टींमध्ये त्यांना आपण वरचढ आहोत हे जाणवू लागलं आहे. हे असं अचानक होण्यामागे आपल्या देशाचा झालेला आर्थिक विकास आणि तंत्रज्ञानाचा विकास फार मोठय़ा प्रमाणावर कारणीभूत आहे, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. आणि तरीही हॉलिवूडच्या या समीकरणांमधून आपल्या चित्रपटसृष्टीला आणि कलाकारांना फायदा होत असेल तर त्यांनी तो करून घेतला पाहिजे, असा सल्लाही अमिताभ यांनी दिला.
आजवर अमिताभ यांनी एक अभिनेता म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत तीन पिढय़ांबरोबर काम केले आहे. आणि गेल्या काही वर्षांत हिंदी चित्रपटांच्या आशयविषयापासून निर्मितीपर्यंतच्या अनेक गोष्टींमध्ये बहदल झाले आहेत. अनुराग कश्यप, इम्तियाज अली, आनंद राय, आर, बाल्की अशा वेगवेगळ्या धाटणीच्या दिग्दर्शकांच्या चित्रपटांनाही तितकेच यश मिळते आहे. यामागे या तरूण दिग्दर्शकांचे, कलाकारांचे विचार कारणीभूत आहेत का?, असे विचारल्यावर या लोकांचा एकमेकांशी संवाद वाढला आहे आणि त्यातून नव-नव्या गोष्टी निर्माण होत असल्याचे अमिताभ यांनी सांगितले. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ट्विटर, फेसबुक आणि ब्लॉग या माध्यमातून कलाकार थेट चाहत्यांशी संवाद साधतात. सोशल मीडियाच्या वापर करून घेण्यात त्यांच्याइतका आघाडीचा अभिनेता नाही. यावर ही सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढलेले चाहत्यांचे कुटुंब आहे त्यांच्याशी संवाद साधण्याची एक सवयच आपल्याला लागली आहे, असे ते सांगतात. मी एकदिवस जरी ब्लॉग लिहिला नाही तर दुसऱ्या दिवशी ‘तुम्ही काल ब्लॉग का लिहिला नाही?’ अशी थेट विचारणा होते. रात्री अडीच वाजोत नाहीतर कितीही उशीर झालेला असो माझ्या ब्लॉगची अनेकजण वाट पहात असतात. त्यामुळे ब्लॉग लिहिणे ही माझी जबाबदारी आहे, असे अमिताभ यांनी सांगितले. अर्थात, या नव्या तंत्रज्ञानाच्या किमयेने आपल्याला मोठय़ा प्रमाणावर प्रभावित केले असल्याचेही ते मान्य करतात. बाहत्तराव्या वर्षी मागे वळून पाहण्यात काहीच हशील नाही असे त्यांना वाटते. मागे वळून पहायचंच असेल तर अशावेळी माँ आणि बाबूजी (हरिवंशराय बच्चन, तेजी बच्चन) यांच्या आठवणींमध्ये, विचारांमध्ये रमायला आवडते, असे त्यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 19th Oct 2014 रोजी प्रकाशित
हॉलिवूडचे आपल्यावरचे प्रेम सिनेमापोटी नाही
मध्यंतरी, हॉलिवूड दिग्दर्शक स्टीव्हन स्पिलबर्ग इथे आले होते. तेव्हा त्यांना काही प्रश्न विचारण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली होती.

First published on: 19-10-2014 at 01:05 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hollywoods love for india or indian market