बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांनी त्यांच्या तीन निवासी मालमत्ता विकल्या आहेत. मुंबईतील अंधेरी येथील यापैकी दोन मालमत्ता राकेश रोशन यांच्या मालकीच्या होत्या आणि एक हृतिक रोशनच्या नावावर होती. पण, आता त्यांनी ती ६.७५ कोटी रुपयांना विकली आहे. यासाठी मोठे नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्क भरण्यात आले आहे.
स्क्वेअरयार्ड्सच्या मते, पहिली मालमत्ता अंधेरी पश्चिमेतील वीजेस निवास सीएचएस लिमिटेडमध्ये आहे. ९५.२६ चौरस मीटरवर पसरलेले हे निवासी युनिट राकेश रोशन यांनी ३.७५ कोटी रुपयांना विकले आहे. त्यात दोन कार पार्किंगची सुविधा आहे. या करारादरम्यान १९ लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क आणि ३०,००० रुपयांची नोंदणी शुल्क जमा करण्यात आले आहे.
राकेश रोशन आणि हृतिक रोशन यांनी विकलेली दुसरी मालमत्ता अंधेरी पश्चिमेतील रहेजा क्लासिकमध्ये आहे. ६०.८९ चौरस मीटरमध्ये पसरलेल्या या मालमत्तेची किंमत २.२० कोटी रुपये आहे. या करारात १३.२० लाख रुपये मुद्रांक शुल्क आणि ३०,००० रुपये नोंदणी शुल्क समाविष्ट आहे. हृतिकने त्याच हाउसिंग सोसायटीमध्ये एक निवासी युनिट खरेदी केले होते आणि ते ८० लाख रुपयांना विकले. हे अपार्टमेंट २२.३० चौरस मीटरमध्ये पसरलेले आहे आणि या करारात पाच लाख रुपये मुद्रांक शुल्क आणि ३०,००० रुपये नोंदणी शुल्क समाविष्ट आहे.
हृतिक रोशनचा आगामी चित्रपट
चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर हृतिक रोशन शेवटचा ‘फायटर’ चित्रपटात दीपिका पादुकोण आणि अनिल कपूर यांच्याबरोबर दिसला होता. त्याचा पुढचा चित्रपट ‘वॉर २’ आहे, ज्यामध्ये ज्युनियर एनटीआरदेखील मुख्य भूमिकेत आहे. हृतिक रोशन ‘क्रिश ४’ मध्ये दिसणार आहे. दिग्दर्शक म्हणून हा त्याचा पहिलाच चित्रपट असल्याने तो त्याची तयारी करत आहे. त्याचे वडील राकेश रोशन त्याचे निर्माते आहेत. अलीकडेच के-पॉप स्टार जॅक्सन वांग हृतिक रोशनच्या घरी कुटुंबाला भेटण्यासाठी गेला होता. त्यानंतर तो ‘क्रिश ४’ चा भाग असणार हे देखील निश्चित झाले. चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झालेले नाही, त्यामुळे त्याच्या प्रदर्शनाबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.