‘फना’ चित्रपटात आमिर खानचा सर्वोत्तम अभिनय पाहायला मिळाला. या चित्रपटात काजोलबरोबरची त्याची जोडीही प्रेक्षकांना आवडली होती. आपल्या आजवरच्या कारकिर्दीत अभिनेत्याने अनेक सुपरहिट सिनेमे इंडस्ट्रीला दिले आहेत.

परंतु, २००६ हे वर्ष अभिनेत्यासाठी खूपच खास ठरलं होतं. रंग दे बसंती या सिनेमाच्या यशानंतर आमिर खान फना या रोमँटिक थ्रिलर चित्रपटात दिसला. पण, तुम्हाला माहीत आहे का की, आमिरच्या आधी हा चित्रपट दुसऱ्याच अभिनेत्याच्या हाती लागला होता. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, निर्मात्यांना हृतिक रोशनबरोबर या चित्रपटात काम करायचे होते; पण अभिनेत्याने तो नाकारला.

‘फना’ चित्रपटाचे दिग्दर्शक कुणाल कोहली यांनी अलीकडेच हे उघड केले. त्यांनी फ्रायडे टॉकीज पॉडकास्टमध्ये ‘फना’ चित्रपटाचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले, “आदित्य चोप्राकडे फना’ची कथा होती. मग मी त्यांना सांगितले की, चला आमिरकडे जाऊया; पण त्यांनी सांगितले की, आमिर ते करणार नाही, मला माहीत नाही की, तो सध्या कोणत्या मूडमध्ये आहे.”

हृतिकने चित्रपट का नाकारला?

कुणालने सांगितले की, आमिरच्या आधी या चित्रपटासाठी हृतिक रोशनशी संपर्क साधला होता; पण त्यावेळी हृतिकने हा चित्रपट करण्यास नकार दिला. तो म्हणाला की, हा चित्रपट ‘मिशन काश्मीर’सारखाच आहे आणि म्हणूनच मला तो करायचा नाही. हृतिकने नकार दिल्यानंतर आम्ही आमिरशी संपर्क साधला आणि त्याला त्याची कथाही खूप आवडली.” हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सुपरहिट झाला होता. या चित्रपटाने उत्तम कामेदेखील केली. कुणाल कोहली दिग्दर्शित या चित्रपटात आमिर खान आणि काजोलची मुख्य भूमिका होती. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

‘वॉर २’ मध्ये दिसणार हृतिक रोशन

हृतिक रोशन सध्या त्याच्या ‘वॉर २’ चित्रपटामुळे चर्चेत आहे, ज्यामध्ये तो कियारा अडवाणीबरोबर दिसणार आहे. दोघांचा हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात कियाराचा रोमँटिक आणि अ‍ॅक्शन अवतार पाहायला मिळणार आहे. चाहते या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत.