हुमा कुरेशी स्टारर पॉलिटिकल ड्रामा वेब सीरिज ‘महारानी’ सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आली आहे. १० एपिसोडमध्ये दाखवण्यात येणाऱ्या या सीरिजची कथा राजकारणाच्या अवतीभवती घुमताना दिसून आली. ‘महारानी’च्या ट्रेलरनंतर प्रेक्षक या सीरिजसाठी मोठ्या प्रमाणात उत्सुकत होते. कारण या सीरिजची कथा बिहारच्या राजकारणाशी जोडली गेली होती. या सीरिजचा जेव्हा ट्रेलर रिलीज झाला, त्यानंतर यात बिहारच्या राजकारणातील मोठं नाव लालू प्रसाद यादव यांची पत्नी राबडी देवी यांचा मुख्यमंत्री बनण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आलाय, असं लोकांना वाटलं होतं. पण सीरिज रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी यावर आपली वेगवेगळी मत मांडायला सुरवात केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘महारानी’ सीरिजमध्ये अभिनेत्री हुमा कुरेशीने ‘रानी भारती’ची भूमिका साकारली आहे. यात रानी भारतीचा पती एका घोटाळ्यामुळे कारागृहात जातो आणि त्यानंतर ती मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसते. या सीरिजचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांनी जो अंदाज बांधला तशी कथा मात्र सीरिजमध्ये दिसली नाही. एका युजरने लिहिलं, “सीरिजच्या सुरवातीला रानी भारतीची भूमिका ही राबडी देवी यांची आठवण करून देते, मात्र ही कथा त्यांच्यावर केलेली दिसून आलेली नाही. कारण सीरिजमध्ये रानी भारती मुख्यमंत्री बनल्यानंतर स्वतः करोडो रूपयांचा घोटाळा उघडकीस आणताना दाखवण्यात आलेली आहे.”

बिहारच्या राजकारणाची झलक पहायला मिळाली
या सीरिजमध्ये बिहारचं राजकारण हुबेहुबे दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यात निर्माते यशस्वी देखील झाले आहेत. बिहारच्या राजकारणातील गुन्हेगारी, दिवसाढवळ्या होणाऱ्या हत्या या सगळ्या घटनांमुळे बिहारची ओळख ‘एक गुन्हेगारी राज्य’ म्हणून कशी झाली आहे, हे देखील दाखवण्याचा प्रयत्न केलाय. या सीरिजमधील कथा ही वास्तविकतेला जोडणारी असल्याची प्रतिक्रिया देखील काही युजर्सनी दिली आहे.

आणखी एक युजर अमन चौबे यांनी लिहिलं, “तसं म्हणायला गेलं तर ‘महारानी’ वेब सीरिजची कथा काल्पनिक आधारावर केली आहे. पण या सीरिजमधील निर्मात्यांची कल्पना आणि वर्तमानात घडत असलेल्या घटनांमध्ये खूपच साधर्म्य दिसून येत आहे.”

‘मुंहझौसा’ या सिग्नेचर डायलॉगमुळे बिहारची अस्सल ओळख
ट्विटरवरील एक युजर नरेंद्र नाथ यांनी लिहिलं, “महारानी सीरिज पहायला सुरवात केली…९० च्या दशकातील बिहारमधील राजकीय परंपरा आणि सामाजिक पार्श्वभूमी दाखवण्याचा उत्तम प्रयत्न झालाय. काही ठिकाणी अतिशयोक्ती झालेली आहे. पण ती वेब सीरिजच्या दृष्टीकोणाने समजू शकतो.” यापुढे लिहिताना त्यांनी अभिनेत्री हुमा कुरेशीने केलेल्या अभिनयाचं कौतूक केलंय. सीरिजमध्ये खोकत खोकत प्रत्येक गोष्टीवर ‘मुंहझौसा’ असं बोलणं अभिनेत्री हुमा कुरेशीचा सिग्नेचर डायलॉग बनला आहे आणि त्यामुळे बिहारची अस्सल ओळख बनते,असं देखील या युजरने लिहिलं.

काही प्रेक्षकांना वाटतो राबडी देवीचा गौरव
‘महारानी’ ही सीरिज बिहाचे राजकीय नेते लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवींचा गौरव करण्यासाठी तयार केली असल्याचा आरोप काही यजुर्सनी केला. परंतू ९० च्या दशकातील बिहराच्या त्या शाही इतिहासाबद्दल जवळजवळ सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे या सीरिजला गौरव म्हणून बघण्यापेक्षा एक पॉलिटिकल थ्रीलरच्या दृष्टीकोणातून बघा, असा सल्ला देखील काही युजर्सनी दिलाय. त्याचप्रमाणे सीरिजमधल्या रानी भारतीची तुलना राबडी देवी यांच्यासोबत करणं चुकीचं आहे, असं देखील काही युजर्सनी म्हटलंय.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Huma qureshi web series maharani based on bihar politics and rabri devi prp
First published on: 30-05-2021 at 17:42 IST