अगदी कमी वेळात महाराष्ट्रातील घराघरांतील लोकांच्या मनात घर करून बसलेली ‘दिल दोस्ती दुनियादारी’ ही प्रसिद्ध मालिका आता अल्पविराम घेत आहे. मात्र, लवकरच या मालिकेचा दुसरा सीझन येणार आहे. त्याविषयी ‘लोकसत्ता ऑनलाईन’ने मालिकेचे निर्माते संजय जाधव यांच्याशी संवाद साधला.
संजय जाधव म्हणाले, आम्ही ‘दिल दोस्ती दुनियादारी’ ही मालिका सिझन्समध्येच करायचे ठरवले होते. आता मालिकेला एक वर्ष पूर्ण होतय त्यानिमित्ताने याच्या पहिल्या सिझनची आम्ही समाप्ती करतोय. दिल दोस्ती.. सुरु करतेवेळीच आम्ही ही मालिका सिझन्समध्ये करायचे ठरवले होते. जेणेकरून १० वर्षानंतरही लोकांनी मालिकेचा पहिला सीझन तितक्याच आवडीने पाहावा हा त्यामागचा हेतू आहे. दुस-या सीझनमधील कलाकारांविषयी बोलाल तर मला नाही वाटत की या सहाजणांची जागा दुसर कोणी घेऊ शकतं. या मालिकेतील कलाकारांची निवड करण्यासाठी आम्ही तब्बल सहा महिने घालवले होते. आता या मालिकेला मिळालेले प्रेक्षकांचे प्रेम पाहता त्या सहा महिन्यांचे चीज झाल्याचे दिसते. जर सर्व प्रेक्षकांचे असेच प्रेम मिळत राहिले तर नक्कीच मला या मालिकेवर चित्रपट काढायला आवडेल.
या मालिकेमुळे मला आणि या मालिकेतील सर्वच मुलांना प्रेक्षकांचे भरघोस प्रेम मिळाले. त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. असेच प्रेम तुम्ही आमच्या पुढच्या सिझनवरही कराल, अशी आम्ही अपेक्षा करतो.



