फरहान अख्तरचा ‘दिल चाहता है’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन दोन दशके झाली आहेत. या चित्रपटात अक्षय खन्ना, आमिर खान, सैफ अली खान, प्रीती झिंटा व सोनाली कुलकर्णी यांच्या भूमिका होत्या. या चित्रपटात डिंपल कपाडियादेखील होत्या. अलीकडेच फरहान अख्तरने डिंपल कपाडिया यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.
‘वेव्हज समिट २०२५’मध्ये फरहान अख्तर म्हणाला, “डिंपल कपाडिया सेटवर आल्यावर मी त्यांच्याशी बोललो. मी त्यांना चित्रपटात कास्ट केले होते; पण मी त्यांना डिंपल आंटी म्हणू शकत नव्हतो. मी त्यांना डिंपलही म्हणू शकत नव्हतो. कारण- डिंपल यांना मी असभ्य आहे, असे वाटले असते. म्हणून मी त्यांना फक्त ‘हो हो, हो हो, ठीक आहे ठीक आहे, हो मॅडम’, असे म्हणत होतो”.
फरहान पुढे म्हणाला, “जेव्हा आम्ही काम करायचो आणि आम्हाला त्यांना बोलवायचे असेल, तर मी डिंपलमॅडमला बोलवा, असे म्हणायचो. मग मी म्हणायचो- तुम्ही तयार आहात का मॅडम? दोन-तीन दिवसांनी त्यांनी विचारले की, तू मला माझ्या नावाने का हाक मारत नाहीस? त्यावर मी म्हणालो- तुम्हाला काय बोलावे हे मला कळत नाही.” यावर त्या म्हणाल्या, तू मला डिंपल बोल. जर तू डिंपल आंटी, असं म्हणालास तर मी हा चित्रपट सोडून देईन. त्यानंतर फरहान मोठ्याने हसतो आणि म्हणतो की, मी एका खूप छान व्यक्तीबरोबर काम केले आहे.”
२०२१ मध्ये ‘दिल चाहता है’ चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झाली. यावेळी फरहान अख्तरने लिहिले होते, “जर डिंपल कपाडिया यांनी चित्रपट नाकारला असता, तर हा चित्रपट बनवला नसता.” पुढे फरहान अख्तरने लिहिले होते, “मला वाटतं की, जर तुम्ही नकार दिला असता, तर मला कदाचित चित्रपट बनवणे थांबवावे लागले असते.”
अभिनेता फरहान अख्तर हा केवळ एक प्रसिद्ध अभिनेता नाही, तर एक प्रतिभावान दिग्दर्शक म्हणूनदेखील सिनेसृष्टीत ओळखला जातो. बॉलीवूडमधील फरहान अख्तरचे अनेक चित्रपट सुपरहिटदेखील ठरले. त्याच्या क्लासिकल सिनेमांमुळे फरहान नेहमी चर्चेत असतो.