Udaipur Files Movie : उदयपूर फाइल्स हा चित्रपट प्रदर्शनापूर्वी वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. उदयपूर फाइल्स हा चित्रपट २०२२ मधील टेलर कन्हैय्या लाल तेली यांच्या हत्याकांडावर आधारित आहे. या आठवड्यात जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष आणि दारूल उलुम देवबंदचे प्राचार्य मौलाना अर्शद मदनी यांनी उदयपूर फाइल्सच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या चित्रपटाचे प्रदर्शन स्थगित करण्यास नकार दिला आहे.
या चित्रपटाचे निर्माते अमित जानी हे असून सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील काही वादग्रस्त दृश्ये काढून टाकण्याचा सल्ला दिला होता. पण तरी देखील अद्यापही हा चित्रपट वादात अडकलेला आहे. दरम्यान, उदयपूर फाइल्स चित्रपटाला ६ कटसह केंद्राने मान्यता दिल्याच्या विरुद्ध जमियतने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी यांनी सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या माध्यमातून केंद्राने उदयपूर फाइल्स चित्रपटाला ६ बदलांसह प्रदर्शित करण्यास दिलेल्या मंजुरीच्या आदेशाला आव्हान देण्यात आलं आहे.
तसेच दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मदनी यांनी केंद्राच्या आदेशावरही आक्षेप नोंदवले आहेत. या याचिकेच्या माध्यमातून मदनी यांनी असा दावा केला की, चित्रपट निर्माते-अमित जानी हे एक स्वयंघोषित कार्यकर्ते आणि उत्तर प्रदेश नवनिर्माण सेनेचे संस्थापक आहेत. काही वृत्तपत्रातील बातम्यांचा हवाला देत मदनी यांनी चित्रपट निर्माते-अमित जानी यांच्यावर काही घटनांमध्ये सहभागी असल्याचा आरोप केला आहे. या संदर्भातील वृत्त Live Law ने दिलं आहे.
अर्शद मदनी यांनी केलेल्या आरोप असा आहे की, “२०१२ मध्ये मायावती यांच्या कार्यालयाची तोडफोड, शिवसेनेच्या कार्यालयाची तोडफोड, राजकीय व्यक्तींना धमक्या देणे, काश्मिरींविरुद्ध जातीय धमक्या देणे, ताजमहाल सारख्या वारसा स्थळांशी संबंधित प्रक्षोभक फोटो शेअर करणे, कन्हैया कुमार आणि उमर खालिद यांना धमकी देणारे पत्र लावणे”, अशा प्रकारच्या घटनांमध्ये सहभागी असल्याचा आरोप मदनी यांनी केला. त्यामुळे हा चित्रपट निर्माते म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींकडून लक्ष्यित राजकीय प्रचार केला जात असल्याचा आरोप अर्शद मदनी यांनी केला आहे.
अर्शद मदनी यांनी पुढे असंही म्हटलं की, “२०२२ मध्ये झालेल्या कन्हैया लाल यांच्या दुर्दैवी आणि निंदनीय हत्येची कथा सांगण्याचा हा चित्रपटाचा दावा आहे. मात्र, हा चित्रपट द्वेषपूर्ण भाषणापेक्षा कमी नाही. तो संपूर्ण समुदायाविरुद्धच्या कट रचणाऱ्या दाव्यांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असून संबंधित घटनेच्या वस्तुस्थितीपासून दूर आहे. या चित्रपटाची थीम, प्रतिमा, संवाद, संदर्भ आणि कथानक याचा विचार केला तर मुस्लिम समुदायाची संपूर्ण बदनामी आणि राक्षसी प्रतिमा यामध्ये दाखवण्यात आली आहे”, असा आरोप अर्शद मदनी यांनी केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
उदयपूरमध्ये टेलरिंगचं (शिवणकाम) काम करणाऱ्या कन्हैयालाल यांची जून २०२२ मध्ये निर्घृण हत्या करण्यात आली होती. नुपूर शर्मा हिने मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. कन्हैयालाल यांनी या वक्तव्याचं समर्थन करणारी पोस्ट समाजमाध्यमांवर शेअर केली होती. त्यामुळे मोहम्मद रियाज व मोहम्मद गौस या दोघांनी मिळून कन्हैयालाल यांची हत्या केली. या हत्या प्रकरणात इतरही काहीजण सहभागी असल्याचा दावा केला जात आहे.