जान्हवी कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्राचा ‘परम सुंदरी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे आणि या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दोघेही या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करीत आहेत. अलीकडेच दोघेही कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये पोहोचले आणि यावेळी जान्हवीने सांगितले की, तिला ३ मुले हवी आहेत. कपिलने तिला यामागील कारण विचारले, तेव्हा ती काय म्हणाली, ते जाणून घ्या.
जान्हवी म्हणाली, “मला वाटते ३ ही चांगली संख्या आहे. पहिली बाब म्हणजे माझ्यासाठी हा लकी नंबर आहे आणि दुसरी बाब म्हणजे भांडणे नेहमीच दोन लोकांमध्ये होतात. अशा परिस्थितीत एकाचा आधार आवश्यक असतो. जो कोणी बहीण असो वा मुलगा, तो डबल ढोलकी असेल, तो दोन्ही बाजूंनी बोलेल. दोघांनाही त्याच्याकडून पाठिंबा मिळेल. मी खूप विचार करून हे प्लॅन केले आहे.” जान्हवीचे हे ऐकून कपिलच नाही तर सिद्धार्थ आणि इतर प्रेक्षकही हसायला लागले.
यापूर्वी जान्हवीने कोमल नाहटाच्या शोमध्ये म्हटले होते, ‘मला लग्न करून माझ्या पती आणि मुलांसह तिरुमला तिरुपतीमध्ये स्थायिक व्हायचं आहे. आम्ही दररोज केळीच्या पानांवर जेवण करू आणि गोविंदा-गोविंदा ऐकू. मी माझ्या केसांमध्ये गजरा लावेन आणि मी मणिरत्नमचं संगीत ऐकेन. मी माझ्या पतीला तेल मालिश करीन.” जान्हवीचे तिरुपतीशी एक खास नाते आहे. ती दरवर्षी तिथे जाते.
लग्नाबाबत जान्हवीने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिचे लग्न तिरुपतीमध्ये व्हावं आणि तिचा मेंदी आणि संगीत समारंभ श्रीदेवी यांच्या वडिलोपार्जित घरी व्हावा, अशी तिची इच्छा आहे.
जान्हवी शिखर पहारियाला करतेय डेट
जान्हवी बऱ्याच काळापासून शिखर पहारियाला डेट करीत आहे. दोघेही एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करतात आणि सुटीवरही जातात. दोघेही शाळेतील मित्र आहेत.
जान्हवी कपूरने आपल्या दमदार स्टाईल आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘धडक’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणाऱ्या जान्हवी कपूरने अवघ्या काही चित्रपटांमध्ये काम करीत यशाचे शिखर गाठले आहे.