Jatadhara teaser : सोनाक्षी सिन्हाच्या ‘जटाधरा’ या नवीन चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटातील व्हीएफएक्सदेखील अद्भुत आहेत, ज्यांची झलक टीझरमध्ये दिसते. निर्मात्यांनी नुकतेच ‘जटाधरा’चे पोस्टर प्रदर्शित केले. त्यानंतर लोकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.
‘जटाधरा’मध्ये सोनाक्षी सिन्हा आणि तेलुगू स्टार सुधीर बाबू हे मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात दोघेही एका नवीन अवतारात दिसणार आहेत. टीझरमध्ये सोनाक्षी आणि सुधीर बाबूदेखील एकमेकांशी टक्कर देताना दिसत आहेत.
चित्रपटाची कथा पौराणिक असून, या कथेत स्वार्थीपणा आणि बलिदान यांमधील संघर्ष दिसतो. सोनाक्षी सिन्हा टीझरमध्ये एका शक्तिशाली आणि क्रूर देवीच्या रूपात दिसते.
चेहऱ्यावरचा राग, डोळ्यांतील अंगार व भेदक आवाज या सगळ्यांमुळे सोनाक्षीचा लूक आजवरच्या चित्रपटांपेक्षा वेगळा ठरतोय. दुसरीकडे सुधीर बाबू शांत; पण दृढनिश्चयी योद्ध्याच्या रूपात आहे. सोनाक्षी आणि सुधीरमध्ये शेवटी युद्ध होताना पाहायला मिळतं.
‘जटाधरा’ चित्रपटाच्या टीझरमध्ये सोनाक्षी सिन्हाचं रौद्र रूप चाहत्यांना आश्चर्यचकित करत आहे. या चित्रपटाद्वारे सोनाक्षी तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे. ‘जटाधरा’चं दिग्दर्शन वेंकट कल्याण आणि अभिषेक जयस्वाल यांनी केलं आहे.
अद्भुत व्हीएफएक्स आणि एआयव्यतिरिक्त या चित्रपटात अॅक्शन, सस्पेन्स व मनोरंजनाचाही समावेश असेल. हा एक अलौकिक थ्रिलर आहे, जो संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे. ‘जटाधारा’चं बजेट १०० कोटी असल्याचं सांगितलं जात आहे. असंही म्हटलं जात आहे की, हा तेलुगू चित्रपटसृष्टीतील सर्वांत महागडा चित्रपट असेल. हा चित्रपट लवकरच सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
सोनाक्षी सिन्हा तिच्या व्यावसायिक आयुष्यामुळे कमी; पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. अभिनेता झहीर इक्बाल याच्याबरोबर लग्न केल्यानंतर सोनाक्षी कायम तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. सोशल मीडियावर झहीरबरोबरचे फोटो पोस्ट करीत सोनाक्षी नवऱ्यावर असलेलं प्रेम व्यक्त करताना दिसते.