जया बच्चन त्यांच्या काळातील टॉप अभिनेत्रींपैकी एक होत्या. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी सत्यजित रे यांच्या ‘महानगर’ या बंगाली चित्रपटातून त्यांनी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर आठ वर्षांनी जया यांनी हृषिकेश मुखर्जी यांच्या ‘गुड्डी’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. जया बच्चन त्यांच्या स्पष्टवक्त्या शैलीसाठीदेखील प्रसिद्ध आहेत. त्या अमिताभ बच्चन यांच्या प्रेमात पडल्या आणि त्यांच्याशी लग्न केले. पण, फार कमी लोकांना माहिती असेल की जया बच्चन यांना सुरुवातीला दुसऱ्या एका हिरोवर क्रश होता.

ते अभिनेते दुसरे तिसरे कोणी नसून धर्मेंद्र होते. एकदा अभिनेत्रीने त्यांची पत्नी हेमा मालिनी यांच्यासमोर धर्मेंद्र त्यांचे क्रश होते हे कबुल केलं होतं. हो, तुम्ही बरोबर वाचले आहे. हे घडले जेव्हा जया बच्चन आणि हेमा मालिनी कॉफी विथ करण या शोमध्ये एकत्र दिसल्या होत्या.

जया बच्चन यांनी त्यांना ‘ग्रीक गॉड’ म्हटले होते. ज्येष्ठ अभिनेत्री म्हणाल्या, “मला बसंतीची (शोलेमधील हेमा मालिनी यांची व्यक्तिरेखा) भूमिका करायला हवी होती, कारण मला धर्मेंद्र खूप आवडायचे. जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा पाहिले तेव्हा मी इतकी नर्व्हस झाले होते की मला काय करावे हेच कळत नव्हते. तिथे एक अतिशय अद्भुत दिसणारा माणूस होता. त्याने पांढरी पँट आणि बूट घातले होते आणि तो अगदी ‘ग्रीक गॉड’सारखा दिसत होता.”

धर्मेंद्र यांच्याबरोबर पहिल्या हिंदी चित्रपटात काम केले

१९७१ मध्ये जया बच्चन यांनी हृषिकेश मुखर्जी यांच्या ‘गुड्डी’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. २२ वर्षीय जया बच्चन यांनी गुड्डीची भूमिका साकारली होती, जी १६ वर्षांची भोळी शाळकरी मुलगी होती, जी तिच्या स्क्रीन आयडॉल धर्मेंद्र यांच्या प्रेमात पडते. चित्रपटात धर्मेंद्र यांनी स्वतःची भूमिका साकारली होती. चित्रपटाप्रमाणेच, जया खऱ्या आयुष्यात धर्मेंद्र यांच्यावर खूप प्रभावित झाल्या होत्या आणि त्यांना ते खूप आवडले होते.

धर्मेंद्र यांनी जया बच्चन यांचे कौतुक केले होते

काही काळापूर्वी धर्मेंद्र यांनी इन्स्टाग्राम हँडलवर एका फोटोची झलक दाखवली होती, ज्यामध्ये जया बच्चन देखील दिसत होत्या. दोघांनी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटात एकत्र काम केले होते. फोटोबरोबर धर्मेंद्र यांनी कॅप्शनमध्ये लिहिले होते, “गुड्डी नेहमीच माझी प्रिय गुड्डी राहील, ती एक जागतिक दर्जाची कलाकार आहे आणि नेहमीच माझी प्रशंसा करते. गुड्डीपासून रॉकी और रानी की प्रेम कहानीपर्यंत.” चाहत्यांनी त्यांच्या फोटोवर प्रेमाचा वर्षाव केला.