करण जोहरचा बहुचर्चित चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’च्या सेटवर सध्या करोनाचा हल्ला झाला आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री शबाना आझमी यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर आता अभिनेत्री जया बच्चन यांनाही करोनाची लागण झाली आहे. जया बच्चन यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ शूटिंग थांबवण्यात आलं आहे.
जया बच्चन यांच्या संपूर्ण कुटुंबाला २०२० मध्ये करोनाची लागण झाली होती. याशिवाय काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचीही करोना चाचणी देखील पॉझिटिव्ह आली होती. पण त्यावेळी जया यातून बचावल्या होता. मात्र यावेळी त्यांना चित्रपटाच्या सेटवर करोनाची लागण झाल्याचं बोललं जात आहे.
‘बॉलिवूड हंगामा’नं दिलेल्या वृत्तानुसार, शबाना आझमी आणि जया बच्चन यांना करोनाची लागण झाल्यानंतर सुरक्षेच्या कारणानं करण जोहरनं ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाचं चित्रिकरण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही अभिनेत्री या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचं पुढील चित्रिकरण दिल्ली येथे होणार होतं. मात्र आता ते पुढे ढकलण्यात आलं आहे.
दरम्यान मागच्या काही दिवसांमध्ये बऱ्याच बॉलिवूड कलाकारांना करोनाची लागण झाली आहे. तसेच राज्यातही करोनाचं संक्रमण वाढताना दिसत आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ बद्दल बोलायचं तर या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर अभिनेत्री शबाना आझमी आणि जया बच्चन या देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.