भारतात पुन्हा एकदा करोना विषाणूचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. दररोज अनेक लोक या विषाणूला बळी पडत आहेत. बॉलीवूडदेखील यातून सुटू शकलेले नाही. अलीकडेच शिल्पा शिरोडकर करोना पॉझिटिव्ह आली होती आणि आता आणखी एक अभिनेत्री त्याच्या विळख्यात आली आहे.
बॉलीवूड अभिनेत्री निकिता दत्ता करोना पॉझिटिव्ह झाली आहे. निकिताबरोबर तिच्या आईलाही करोनाची लागण झाली आहे. निकिताने स्वतः याबाबत माहिती दिली आहे. निकिताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून, ती करोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर याबाबतची एक पोस्ट शेअर केली आहे.
निकिताची हेल्थ अपडेट
निकिताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिले आहे- “करोना मला आणि माझ्या आईला हॅलो करण्यासाठी आला आहे. मला आशा आहे की, हा बिनबोभाट पाहुणा जास्त काळ राहणार नाही. शॉर्ट क्वारंटाईननंतर भेटू. सर्व जण सुरक्षित राहा.” निकिता सध्या तिच्या घरी क्वारंटाईन आहे. तिला सौम्य लक्षणं आहेत; परंतु ती बरी होईपर्यंत तिने तिचे काम आणि वर्क कमिटमेंट थांबवल्या आहेत.
निकिता नुकतीच ‘ज्वेल थीफ’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाद्वारे तिचे ‘बॉलीवूडचे स्वप्न’ पूर्ण झाले आहे, असेही तिने सांगितले. ती म्हणाली, “सिद्धार्थ आनंदच्या जगाचा भाग असणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. या चित्रपटाने मला एका क्लासिक बॉलीवूड नायिकेची भावना दिली आहे. हे फक्त डान्सबद्दल नाही, तर मला एका अभिनेत्रीसारखे वाटण्याची संधी मिळाली.”
शिल्पा शिरोडकरही झाली होती करोनाची शिकार
अलीकडेच बिग बॉस १८ फेम शिल्पा शिरोडकरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. शिल्पाने ती करोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. तिने लिहिले होते- “नमस्कार मित्रांनो, मी करोना पॉझिटिव्ह आहे. सुरक्षित राहा आणि मास्क घाला.” पण, गुरुवारी शिल्पाने चाहत्यांना एक चांगली अपडेट दिली. तिने सांगितले की, ती पूर्णपणे बरी झाली आहे.
कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, निकिता अलीकडेच सैफ अली खान आणि जयदीप अहलावतबरोबर ‘ज्वेल थीफ’मध्ये दिसली होती. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.