Oscars Awards 2024: ऑस्कर २०२४ सोहळ्याची दमदार सांगता झाली आहे. दरवर्षी जगभरातील चित्रपटप्रेमी या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत होते, अखेर हा सोहळा दिमाखात पार पडला असून विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. ९६ व्या अकादमी पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन चौथ्यांदा जिमी किमेल याने केलं. या सोहळ्यात सिलियन मर्फी सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला, तर एमा स्टोनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला. या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात ‘ओपेनहायमर’ चित्रपटाला सात ऑस्कर पुरस्कार मिळाले.

ख्रिस्तोफर नोलनने ‘ओपेनहायमर’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा प्रतिष्ठीत ऑस्कर पुरस्कार जिंकला तर सिलियन मर्फीने ‘ओपेनहायमर’मधील त्याच्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर जिंकला. याबरोबरच याच चित्रपटात एक मुख्य भूमिका निभावणाऱ्या रॉबर्ट डाउनी ज्युनियरला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. हा त्याचा पहिला ऑस्कर पुरस्कार आहे. त्याच्या चाहत्यांमध्ये एक उत्साह आणि आनंद पाहायला मिळत असला तरी प्रथेप्रमाणे यंदाच्याही या ऑस्कर सोहळ्याला गालबोट लागल्याचं पाहायला मिळत आहे. यासाठी निमित्त ठरलं आहे ते म्हणजे याचा सूत्रसंचालक जिमी किमेल.

आणखी वाचा : वजन कमी झाल्याने सेटवरुन दिव्या दत्ताला पाठवलेलं घरी; अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ अनुभव

जिमी किमेलने रॉबर्ट डाउनी ज्युनियरला ऑस्कर मिळाल्याबद्दल अभिनंदन करताना त्याच्या ड्रग अॅडिक्शनचा उल्लेख करत त्याची खिल्ली उडवली. अर्थात हे सगळं मस्करीत सुरू होतं अन् डाउनी ज्युनियर यानेदेखील ही सगळी गोष्ट मनावर न घेता हसण्यावारी नेली असली तरी सोशल मीडियावर जिमी किमेलच्या या कृतीवर लोकांनी टीका केली आहे. जिमी किमेल म्हणाला, “हा पुरस्कार मिळणं हे रॉबर्ट डाउनी ज्युनियरच्या मोठ्या करिअरमधील सर्वात उंच शिखर आहे, किंवा हे त्याच्या करिअरच्या काही अत्युच्च शिखरांपैकी एक आहे.” हे सांगताना त्याने नाकाच्या ठिकाणी इशारा करत रॉबर्टच्या ड्रग अॅडिक्शनवर भाष्य केलं. इतकंच नव्हे तर त्याने रॉबर्ट डाउनी ज्युनियरच्या गुप्तांगाबद्दलही एक विनोद केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे सगळं रॉबर्टने अत्यंत मस्करीत सहन केलं, पण त्याच्या चाहत्यांनी मात्र सोशल मीडियावर व्यक्त व्हायला सुरुवात केली आहे. कित्येक चाहत्यांनी जिमी किमेलच्या या कृतीवर टीका केली असून रॉबर्ट डाउनी ज्युनिअर याने काशाप्रकारे त्या ड्रग अॅडिक्शनवर मात केली हे सांगत आपल्या लाडक्या अभिनेत्याची बाजू घेतली आहे. बऱ्याच लोकांनी याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांचा खेद व्यक्त केला आहे.