प्रतिनिधी, मुंबई एकेकाळी जी भूमिका आणि चित्रपट आमिर खानने गाजवला. त्याच्या सिक्वेलमध्ये आता जॉन अब्राहमची वर्णी लागली आहे. ‘सरफरोश २’च्या सिक्वेलमध्ये आमिरऐवजी जॉन काम करतोय. याला जॉननेही नुकताच दुजोरा दिला आहे. जॉन सध्या ‘सविता दामोदर परांजपे’ चित्रपटाच्या निमित्ताने मराठीत निर्माता म्हणून येत असून त्याचा ‘सत्यमेव जयते’ हा चित्रपटही प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. ‘सरफरोश’च्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये जॉन आहे हे कळल्यानंतर त्याचे चाहतेही खूष झाले असून जॉनही आनंदी आणि उत्सुक आहे. सध्या त्याला अॅक्शन, ड्रामा करणे आवडू लागले आहे. ‘सरफरोश’ हा चित्रपट १९९९ मध्ये जॉन मॅथ्यू मथान यांनी दिग्दर्शित केला होता. यामध्ये ‘परफेक्शनिस्ट’ आमिर खान, सोनाली बेंद्रे आणि नसरुद्दीन शाह यांच्यासोबत इतर अनेक मेहनती कलाकार होते. याविषयी जॉन म्हणाला, ‘सरफरोश’च्या सिक्वेलचे अजून पटकथा लेखन सुरू आहे. जॉन मॅथ्यू मथान यांच्यासोबत दुसऱ्या एका चित्रपटासाठी मी सहनिर्माता म्हणूनही आहे. जॉन मॅथ्यू हे खूप चांगले निर्माता, दिग्दर्शक आहेत. त्यांचा ‘सरफरोश’ चित्रपट पाहून मी त्यांचे अभिनंदन करायला घरी गेलो होतो. त्यांना मी मला चित्रपट खूप आवडल्याचे सांगितले. आमिर खान या दुसऱ्या भागात असणार की नाही हे स्पष्ट झाले नसले तरी जॉन म्हणाला, मी आमिरचा चाहता आहे. त्याचे ‘सरफरोश’मधील काम लाजवाब होते, पण या दुसऱ्या भागाची कथा वेगळी आहे आणि त्यातील भूमिका आव्हानात्मक आहे. जुन्या ‘सरफरोश’ चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरले होते, आता जॉनचा ‘सरफरोश २’ काय कमाल करतो त्यासाठी थोडे थांबावे लागेल. हा चित्रपट पुढच्या वर्षी चित्रीकरणासाठी सज्ज होणार आहे.