काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ्यामुळे दुबईत राहिल्यानंतर अभिनेता कादर खान भारतात परतले आहेत. तसेच, त्यांनी नव्या कामाला जोर लावला आहे. अभिनेता कादर खान एका चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. त्याचे नाव ‘इन योर आर्म्स’ असे आहे. हा चित्रपट त्यांच्या कुटुंबातील तीन पिढ्यांवर बनवला जाणार आहे.
कादर खान यांनी या चित्रपटात आपल्याच दोन मुलांना सरफराज आणि शाहनवाज यांना मुख्य भूमिकेत घेतले आहे. या चित्रपटात त्यांचा आठ वर्षांचा नातू हमझा (सरफराजचा मुलगा) हा देखील काम करणार आहे. चित्रपटाची कथा ही पती-पत्नीच्या नात्यावर असून घटस्फोटाच्या पायरीवर असलेल्या या नात्यावर चित्रिकरण करण्यात आले आहे. हा चित्रपट देशभर प्रदर्शित होणार आहे. मात्र, प्रदर्शनाची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही.
यापूर्वी, राज कपूर यांनीदेखील १९७१ मध्ये ‘कल आज और कल’ नावाने एक चित्रपट बनवला होता. त्यात त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर, स्वत: राज कपूर आणि मुलगा रणधीर कपूर यांनी काम केले होते.