आजकाल सेलिब्रिटींसोबतच त्यांच्या मुलांचीही सोशल मीडियावर चर्चा असते. स्टारकिड्सचं बाहेर वावरणं, त्यांचं फॅशन याबाबत नेटकऱ्यांमध्ये मतमतांतरे सुरुच असतात. अनेकदा त्यामुळे स्टारकिड्सना ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं. अभिनेता अजय देवगणची मुलगी न्यासा सध्या सोशल मीडियावर तिच्या कपड्यांमुळे चर्चेत आहे. न्यासा नुकतीच वडिलांसोबत मंदिरात गेली होती. पण त्यावेळी तिने परिधान केलेले कपडे नेटकऱ्यांना रुचले नाही.

क्रॉप टॉप व पँट अशा कपड्यांमध्ये न्यासा वडिलांसोबत मंदिरात पोहोचली होती. यावेळी छायाचित्रकारांनी तिचे काही फोटो काढले. हे फोटो क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि न्यासा ट्रोलिंगची शिकार झाली. “आजकालच्या मुलांना मंदिरात कोणते कपडे परिधान करुन प्रवेश करावा हेच ठाऊक नाही”, असं एकाने म्हटलं. तर “तू मंदिरात जातेयस की जिमला”, असा उपरोधिक प्रश्न दुसऱ्या युजरने विचारला.

कपड्यांवरुन न्यासा अशाप्रकारे ट्रोल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. न्यासाला ट्रोल करणाऱ्यांना अजय देवगणने एका मुलाखतीत उत्तर दिलं होतं. “स्टारकिड्सचे प्रत्येक ठिकाणी फोटो काढणं बंद करा अशी विनंती मी पापाराझींना करतो. सेलिब्रिटींची मुलं असल्याचा फटका त्यांनी का भोगावा? कधीकधी ते इतके लहान असतात की फोटोग्राफर्ससमोर कसं वागावं हे त्यांना नाही समजत. त्यांना मुक्त वावरण्याचं स्वातंत्र्य द्या”, असं तो म्हणाला होता.