बॉलीवूडची ‘क्वीन’ म्हणून आज अभिनेत्री कंगना रणौत प्रसिद्ध आहे. या अभिनेत्रीने तिच्या अभिनयाने सर्वांना भुरळ पाडली. ‘राज २’, ‘क्वीन’, ‘तनू वेड्स मनू’, ‘तनू वेड्स मनू २’ यांसारख्या चित्रपटांतून तिच्या अभिनयाची जादू आपण पाहिलीच आहे. व्यावसायिक आयुष्यात आघाडीवर असणारी अभिनेत्री खासगी आयुष्यात मात्र एकटी आहे. कंगनाचा अगदी नेमकाच मित्रपरिवार आहे. त्यामुळे ब-याचदा एकटेपणा जाणवत असल्याचे खुद्द कंगनानेच सांगितले.
प्रसिद्ध लेखक चेतन भगतच्या ‘वन इंडियन गर्ल’ या पुस्तकाचे शनिवारी मुंबईत कंगनाच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या पुस्तकाची नायिका करियरमध्ये उच्च शिखरावर आहे. मात्र, तिला आयुष्यात खरे प्रेम अद्याप मिळालेले नाही. या पुस्तकातील नायिकेत आणि आपल्यात बरेचसे साम्य असल्याचे कंगनाला वाटते. यावेळी आपण अजूनही ‘सिंगल’ का आहोत याचे कारण कंगनाने सर्वांसमोर सांगितले. कंगना म्हणाली की, इतर पुरुष आणि माझे ‘बॉयफ्रेण्ड्स’ माझ्या यशावर जळायचे. मी जसजशी यशस्वी होत गेले तसं त्यांना असुरक्षित वाटू लागलं. याचाच परिणाम आमच्या नात्यावर पडल्याने माझे ‘ब्रेकअप्स’ झाले. आज कंगना यशाच्या शिखरावर आहे पण याक्षणी तिच्याकडे आपलसं म्हणणार अशी व्यक्ति नाहीये.
बॉलीवूडमध्ये यशस्वी होण्यापूर्वी कंगना ही अभिनेता आदित्य पंचोलीची प्रेयसी म्हणून ओळखली जायची. त्यानंतर तिचे नाव अभिनेता अध्ययन सुमन याच्याशी जोडले गेले. पण तरीही कंगनाची ‘लव लाइफ’ अद्याप काही स्थिरावलेली नसल्याचेच चित्र आहे. काही महिन्यांपूर्वीच कंगनाने बॉलीवूडमधील आघाडीचा अभिनेता हृतिक रोशन याचा उल्लेख ‘सिली एक्स’ असा केला होता. या दोघांमध्ये काही नातं होत की नाही याचा अद्याप खुलासा झालेला नाही. पण या दोघांमधील शाब्दीक चकमक बरीच चर्चेत राहिली.
लवकरचं कंगना विशाल भारद्वाजच्या ‘रंगून’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसेल. तसेच, हंसल मेहताच्या ‘सिमरन’ या चित्रपटातही ती मुख्य भूमिका साकारणार आहे.