मल्याळम, तेलुगू चित्रपटसृष्टीप्रमाणेच सध्या कन्नड चित्रपटसृष्टीतही वेगवेगळे प्रयोग आपल्याला पाहायला मिळत आहे. नुकताच हिंदीमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कांतारा’ या चित्रपटाची सगळीकडेच चर्चा सुरू आहे. कन्नड भाषेत तर या चित्रपटाने तूफान कमाई केली आहेच. आता हिंदीमध्येही या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळताना आपल्याला दिसत आहे. सामान्य माणसापासून सेलिब्रिटीपर्यंत कित्येकांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे.

‘कांतारा’ हा चित्रपट कर्नाटकातील एका लोककलेवर आणि तिथल्या अनुसूचित वर्गाच्या रूढी परंपरा यांच्यावर आधारित आहे. तसेच गावातील जमीनदार वर्गाची मक्तेदारी आणि त्यांनी केलेल्या अन्याय या गोष्टीलासुद्धा या चित्रपटाच्या माध्यमातून वाचा फोडायचा प्रयत्न केला आहे. याविषयी बोलताना चित्रपटाचा दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता रिषभ शेट्टी म्हणाला, “सर्वप्रथम आम्ही या चित्रपटाचं डबिंग करणारच नव्हतो. ओटीटीवर प्रदर्शित करताना हा चित्रपट डब करू असा आमचा विचार होता. पण गेल्या काही दिवसांत या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद बघता आम्ही तो हिंदीमध्ये डब करायचा निर्णय घेतला.”

आणखी वाचा : “करीना शूटिंगला जाते आणि मी तैमूरची…” सैफ अली खानने केला खुलासा

या चित्रपटाच्या वेगळेपणाबद्दलही रिषभने वक्तव्य केलं आहे. ‘झुम डिजिटल’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये रिषभ म्हणाला की, “भारतीय प्रेक्षक खूप संवेदनशील आहे. त्यांना आपल्या सांस्कृतिक मुळांना धरून असलेल्या कलाकृती बघायला आवडतात. काही फिल्ममेकर्सचा असे चित्रपट चालणार नाहीत असा गैरसमज होता, पण प्रेक्षकांना वेगळ्याच कथा बघायच्या आहेत. त्यांना त्यांच्या मुळांशी जोडलेल्या, आपल्या मातीतील कथा मोठ्या पडद्यावर बघायच्या आहेत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबरोबरच रिषभ याने कन्नड चित्रपटांच्या प्रगतीबद्दलही भाष्य केलं आहे. रिषभ म्हणाला, “७० आणि ८० च्या दशकात कन्नड सुपरस्टार डॉ.राजकुमार यांचे चित्रपट वेगवेगळ्या भाषेत डब केले जायचे. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये उतार चढाव असतातच. आमची चित्रपटसृष्टीही यातून बाहेर येत आहे त्याचा मला आनंद आहे. ‘केजीएफ’च्या यशानंतर लोकांची कन्नड चित्रपटाकडे ओढ आणखी वाढली आहे.” कांताराने कन्नड भाषेत १०० कोटीचा आकडा पार केला आहे आणि आता हिंदीतही याची चांगलीच घोडदौड सुरू आहे.