Kantara Chapter 1 (Kantara 2) Box Office Collection Day 2: दिग्दर्शक, अभिनेता ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा’ हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन केलं होतं. आता तीन वर्षांनंतर या फ्रँचायझीचा दुसरा भाग, ‘कांतारा चॅप्टर १’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दोन दिवसांत या चित्रपटाने दमदार कमाई केली आहे.
इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, ‘कांतारा चॅप्टर १’ चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ४५ कोटी रुपये कमावले. या चित्रपटाचे भारतातील कलेक्शन १०६.८५ कोटी रुपये झाले आहे.
‘कांतारा’ने पहिल्या दोन दिवसांत फक्त ४.६ कोटी रुपये कमावले होते. ते पाहता या चित्रपटाने दोन दिवसांत खूपच चांगला व्यवसाय केलं आहे. ‘कांतारा’ने जगभरात ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती. तर ‘कांतारा चॅप्टर १’ने फक्त २ दिवसांत त्याच्या एक चतुर्थांश कलेक्शन केले आहे. वीकेंडला या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आधीच्या दोन दिवसांप्रमाणेच सिनेमाचे कलेक्शन राहिले, तर वीकेंडला हा चित्रपट २०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडू शकतो.
या वर्षाच्या सुरुवातीला, हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरचा वॉर २ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याचीही प्रेक्षकांमध्ये खूप क्रेझ होती. कारण वॉर खूप गाजला होता. वॉर २ ने दोन दिवसांत ११० कोटी रुपये कमावले होते. ‘कांतारा चॅप्टर १’ने भारतात चांगली कमाई केली आहे.
कांतारा चॅप्टर १ ट्रेलर
‘कांतारा चॅप्टर १’ पाहण्यासाठी सर्वाधिक गर्दी कर्नाटकमध्ये होत आहे. सकाळी आणि दुपारचे शो पाहण्यासाठी अनुक्रमे ६०.०३% आणि ९०.७३% गर्दी होती. तर, संध्याकाळ आणि रात्रीच्या शोच्या अनुक्रमे ८६.४८% आणि ९२% जागा भरल्या होत्या. चित्रपटाचे कन्नड भाषेत जवळपास १५०० शो होते, ज्यामध्ये बेंगळुरूमध्ये ९५० हून अधिक शो होते. चित्रपटाचे तेलुगू भाषेत १००० हून अधिक शो आणि हिंदीमध्ये तब्बल ४६८३ शो होते, जे मूळ कन्नड भाषेतील शोच्या संख्येपेक्षा दुप्पट आहे. परिणामी चित्रपटाचे हिंदीतील कलेक्शनही दमदार आहे.
ऋषभ शेट्टीने स्वतः दिग्दर्शित केलेल्या ‘कांतारा चॅप्टर १’ या चित्रपटात रुक्मिणी वसंत, गुलशन देवैया आणि जयराम हे कलाकारही आहेत.