मृणाल ठाकूरचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता; ज्यामध्ये अभिनेत्रीने बिपाशा बासूच्या लूकवर कमेंट केल्या होत्या. हा व्हिडीओ बराच जुना होता; पण तो व्हायरल होताच दोन्ही अभिनेत्रींमधील वाद पुन्हा सुरू झाला.
मृणाल ठाकूरला तिच्या जुन्या कमेंटवर स्पष्टीकरण देताना अभिनेत्रीची माफी मागावी लागली. या सगळ्यामध्ये रेडिटवर करीना कपूरच्या अशा अनेक कमेंट व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये बेबोने एक-दोन नाही, तर तिच्या अनेक सहकलाकारांवर आक्षेपार्ह कमेंट केल्या होत्या. अभिनेत्रीने सलमान खान आणि हृतिक रोशनच्या लूकवरही कमेंट केली होती.
करीना कपूरच्या जुन्या कमेंट्स एका व्हायरल रेडिट थ्रेडमध्ये शेअर करण्यात आल्या आहेत. करीनाने कोणाला आणि कधी काय म्हटले याची सविस्तर माहिती या थ्रेडमध्ये आहे. ही पोस्ट शेअर करताना, सोशल मीडिया वापरकर्त्याने रेडिटवर लिहिले की, करीना ही बॉलीवूडची ‘मीन गर्ल’ आहे; पण ती एक स्टार किड असल्याने तिला कोणीही काहीही बोलत नाही.
या पोस्टमध्ये बेबोने ‘देवदास’ चित्रपटातून बाहेर पडल्यानंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळींवर केलेल्या टिप्पणीचाही उल्लेख आहे. शाहरुख खानबरोबरचा ‘देवदास’ हा चित्रपट प्रथम करीनाला ऑफर करण्यात आला होता; परंतु अखेर ऐश्वर्या रायला या चित्रपटात कास्ट करण्यात आले, ज्यामुळे बेबोने संजय लीला भन्साळींना मूर्ख, विजनलेस डायरेक्टर, असे म्हटले होते.
तिच्या सहकलाकारांना बॉडीशेम करण्यात करीना कधीही मागे राहिलेली नाही. ‘कॉफी विथ करण’ असो किंवा अभिनेत्रीच्या जुन्या मुलाखती असोत, ती नेहमीच तिच्या सहकाऱ्यांबद्दल विचार न करता बोलली आहे. प्रीती झिंटाच्या वयाबद्दल टोमणे मारणे असो किंवा चित्रपटाच्या सेटवर बिपाशा बासूबरोबर झालेल्या वादाबद्दल बोलणे असो, करीना कपूरने सार्वजनिक ठिकाणी अभिनेत्रीला अपमानित करण्याची एकही संधी सोडली नाही.
२००० मध्ये करीना हृतिक रोशनबरोबर ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून डेब्यू करणार होती. तिने या चित्रपटाचे शूटिंगही सुरू केले होते; परंतु कमी स्क्रीन टाइममुळे तिने हा चित्रपट सोडला. त्यानंतर तो चित्रपट अमिषा पटेलला मिळाला. ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाच्या यशाबद्दल बोलताना, करीनाने हृतिक रोशनच्या लूकवर टिप्पणी केली आणि म्हटले होते की, चित्रपट पाहिल्यानंतर तिला अमिषा पटेलबद्दल वाईट वाटले.
बेबोने सलमान खानवर कमेंट केली होती आणि त्याला वाईट अभिनेता म्हटले होते. त्याबरोबरच तिने अभिनेत्याला बॉडी शेम करताना असेही म्हटले होते की, लठ्ठपणा कोणत्याही प्रकारे सेक्सी नाही. लोकांनी अभिनेत्रीला ट्रोल केले आणि म्हटले की, ती नेहमीच वाईट होती.