Sunjay Kapoor Will Case: सोना कॉमस्टारचे दिवंगत अध्यक्ष संजय कपूर यांच्या मृत्युपत्रावरील सुरू असलेल्या वादाला आता एक नवीन वळण मिळाले आहे. त्यांची माजी पत्नी अभिनेत्री करिश्मा कपूरच्या मुलांनी गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात आरोप केला की, संजय कपूर यांच्या ३०,००० कोटी रुपयांच्या मालमत्तेची वाटणी करणारे मृत्युपत्र बनावट आहे. हे मृत्युपत्र सावत्र आई प्रिया सचदेव कपूर आणि इतरांनी केलेला एक गुन्हेगारी कट आहे.

करिश्मा कपूरच्या मुलांच्या बाजूने लढणारे ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी न्यायमूर्ती ज्योती सिंह यांच्यासमोर युक्तिवाद करताना आरोप केला की, संजय कपूर यांचा मृत्युपत्र तयार करण्यात किंवा त्यात बदल करण्यात कोणताही सहभाग नव्हता. टाइप केलेल्या मायक्रोसॉफ्ट वर्ड फाईलमध्ये १७ मार्च २०२५ रोजी संजय कपूर सुट्टीवर असताना बदल करण्यात आला आहे. शिवाय, मृत्युपत्रात बदल करणारी व्यक्ती अंत्यसंस्काराच्या दुसऱ्याच दिवशी एका कंपनीत संचालक बनली. मृत्युपत्र बनावट असल्याचे सिद्ध झाल्यास जन्मठेपेची शिक्षा होते, असे जेठमलानी यांनी निदर्शनास आणून दिले.

दिवंगत संजय कपूर यांच्या पत्नी प्रिया कपूर यांच्यावरील इतर मोठ्या आरोपांपैकी एक म्हणजे त्यांना मिळालेला मालमत्तेचा ६० टक्के वाटा. जेठमलानी यांनी असा युक्तिवाद केला की, प्रिया कपूर फक्त त्यांच्या वैयक्तिक मालमत्तेशी संबंधित होत्या.

जून २०२५ मध्ये उद्योगपती संजय कपूर यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या अंदाजे ३०,००० कोटी रुपयांच्या संपत्तीवरून कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्या पत्नी प्रिया सचदेव कपूर यांना सीलबंद लिफाफ्यात मालमत्तेची तपशीलवार यादी सादर करण्याची परवानगी दिल्यानंतर हा वाद वाढला आहे.

सोना कॉमस्टारचे मार्केट कॅप ३०,००० कोटी रुपयांच्या जवळपास आहे. कंपनीचे ७२ टक्के शेअर्स गुंतवणूकदारांकडे आहेत आणि २८ टक्के शेअर्स (८,२०० कोटी रुपये) कॉर्पोरेट प्रमोटर ऑरियस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडकडे आहेत.

करिश्मा कपूरचे माजी पती आणि सोना कॉमस्टारचे अध्यक्ष संजय कपूर यांचे १२ जून २०२५ रोजी रात्री निधन झाले होते. मृत्यूच्या वेळी ते ब्रिटनमध्ये पोलो खेळत होते. घोड्यावर स्वार होत असताना, एक मधमाशी त्यांच्या तोंडात गेली, ज्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला आणि नंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तातडीने वैद्यकीय मदत मिळाल्यानंतरही ते वाचू शकले नाहीत.