करण जोहरच्या ‘दोस्ताना-२’ सिनेमातून बाहेर काढल्यानंतर अभिनेता कार्तिक आर्यन चांगलाच चर्चेत आला होता. यानंतर आता कार्तिक कोणत्या सिनेमात झळकणार याकडे चाहत्यांनी डोळे लावले होते. यातच आता कार्तिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केल्याने चाहत्यांची उत्सुकता ताणली गेलीय.
कार्तिक आर्यनने शेअर केलेल्या फोटोत तो हटके लूकमध्ये दिसून येतोय. तसचं फोटोसोबत कार्तिकने एक खास कॅप्शन दिलंय. या कॅप्शनमुळे चाहत्यांची उत्सुकता अधिक ताणली गेली. या फोटोत कार्तिकचा चेहरा अंधारात आहे. त्याने ओव्हरकोट परिधान केलाय. तर फोटोमध्ये कार्तिकचा चेहरा स्पष्ट दिसत नसला तरी त्याचे केस लांब असल्याचं लक्षात येतंय. त्याने हातात शस्त्रासारखं काहीतरी पकडल्याचं दिसतंय. कमेंटमध्ये तो म्हणालाय, “आ रहा है कुछ अलग सा..अंदाज लावा” असं म्हणत कार्तिकने चाहत्यांना कोड्यात टाकलं आहे.
View this post on Instagram
कार्तिक आर्यनच्या या फोटोला त्याच्या अनेक चाहत्यांनी पसंती दिलीय. तर अनेकांनी तूच सांग काय होणार आहे अशी कमेंट करत कार्तिकला हे सिक्रेट काय आहे? असा प्रश्न विचारला आहे.
तर २० जूनला कार्तिक आर्यनच्या ‘धमाका’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज होवू शकतो असा अंदाज नेटकऱ्यांकडून लावला जातोय. राम माधवानी दिग्दर्शित ‘धमका’ सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या सिनेमात कार्तिक एका वृत्त निवेदकाची भूमिका साकारताना दिसून येणार आहे.