जम्मू-काश्मीरमधील पहलगाम इथल्या बैसरन खोऱ्यात पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर संपूर्ण देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या घटनेबाबत प्रसिद्ध गायिका कविता कृष्णमूर्ती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्येष्ठ गायिका कविता कृष्णमूर्ती यांनी आपल्या सुंदर आवाजाने अनेक भाषांमध्ये असंख्य गाणी गाऊन अनेक रेकॉर्ड बनवले आहेत. अलिकडेच कविता कृष्णमूर्ती यांनी भारतामध्ये पाकिस्तानी कलाकारांवर घातलेली बंदी आणि म्युझिक इंडस्ट्रीबद्दल सांगितले आहे. म्हणाल्या की, “देशात अनेक चांगले गायक आहेत ज्यांना पुढे आणण्याची गरज आहे”.
भारतीय टॅलेंटला प्रोत्साहन देण्यावर भर
त्यांनी असेही म्हटले की, भारताने यापूर्वीही पाकिस्तानी गायकांना स्वीकारले आहे. आता आपण आपल्या देशातील प्रतिभेला प्रोत्साहन देण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. कविता कृष्णमूर्ती पुढे म्हणाल्या, “पाकिस्तानी कलाकारांनी भारतात खूप गाणी गायली आहेत. लोकांनी त्यांना स्वीकारले आहे आणि मला वाटते की, हे असेच चालू राहील. परंतु मला वाटते की, तुम्ही योग्य संधींची वाट पाहणाऱ्या अनेक भारतीय कलाकारांनाही संधी देऊ शकता; मग त्यांनाही संधी का देऊ नये”.
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरही कविता कृष्णमूर्ती यांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “जेव्हा हे घडले तेव्हा आम्ही सर्व जण खूप दुःखी झालो होतो. एक देशभक्त म्हणून मी माझ्या सरकारच्या सर्व निर्णयांना पाठिंबा देऊ इच्छिते. मी माझ्या सरकारचा आदर करते. मी माझ्या पंतप्रधानांचा आदर करते”.
तामिळ कुटुंबामध्ये जन्मलेल्या कविता कृष्णमूर्ती यांनी बॉलिवूडमध्ये अनेक लोकप्रिय गाणी गायली आहेत. ही गाणी आजही प्रेक्षकांच्या ओठांवर आहे. कविता यांना गायलेल्या गाण्यांसाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. कविता कृष्णमूर्ती यांना चार वेळा फिल्मफेअरचं सर्वोत्तम गायिका म्हणून पारितोषिक मिळालं आहे. ‘1942 अ लव्ह स्टोरी’, ‘याराना’, ‘खामोशी’, ‘देवदास’ या सिनेमांतील गाण्यांसाठी त्यांना हे पुरस्कार मिळाले होते.